संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

🌱 नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🌸 *||सार्थ ज्ञानेश्वरी||*
♦️ *||अध्याय बारावा ||*
🌸 *||भक्तियोग||*
🌱 *||ओवी ५१ पासून||*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳
*🍀मग कुंडलिनियेचा टेंभा । आधारीं केला उभा ।तया चोजवलें प्रभा । निमथावरी ॥५१॥*
     मग कुंडलिनीची मशाल आधारचक्रावर उभी केली व तिच्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रपर्यंत मार्ग समजला.
*🍀नवद्वारांचिया चौचकीं । बाणूनि संयतीची आडवंकी ।उघडिली खिडकी । ककारांतींची ॥५२॥*
     शरीरातील नवही द्वारांच्या कवाडावर संयमाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीचे मुख उघडले.
*🍀प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे ।मनोमहिषाचेनि मुंडें । दिधलीं बळी ॥५३॥*
     प्राणशक्तिरूपी चामुंडा देवीला संकल्परूपी मेंढे मारून ते व मनोरूपी महिषाचे मस्तक हे बळी दिले.
*🍀चंद्रसूर्यां बुझावणी । करूनि अनुहताची सुडावणी ।सतरावियेचें पाणी । जिंतिलें वेगीं ॥५४॥*
     इडा व पिंगळा नाड्यांचा सुषुम्नेत प्रवेश करून अनाहत शब्दाचा गजर खुला केला व चंद्रामृत त्वरेने जिंकून घेतले.
*🍀मग मध्यमा मध्य विवरें । तेणें कोरिवें दादरें ।ठाकिलें चवरें । ब्रह्मरंध्र ॥५५॥*
      मग सुषुम्ना नाडीमधील कोरीव अशा विवररूपी दादरावरून ब्रह्मरंध्राचे शिखर प्राप्त करून घेतले.
*🍀वरी मकारांत सोपान । ते सांडोनिया गहन ।काखे सूनियां गगन । भरले ब्रह्मीं ॥५६॥*
     शिवाय आज्ञाचक्ररूप अथवा ॐकाराची तिसरी मात्रा जो मकार त्या मकाररूपी जिन्याचा बिकट शेवट जे चढून जातात व मूर्ध्न्याकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी ऐक्याला पावतात.
*🍀ऐसे जे समबुद्धी । गिळावया सोऽहंसिद्धी ।आंगविताती निरवधी । योगदुर्गें ॥५७॥*
      अशा प्रकारे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवलेले जे असतात ते सोऽहंसिद्धि (मी ब्रह्म आहे अशी भावना) काबीज करण्याकरता योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात.
*🍀आपुलिया साटोवाटी । शून्य घेती उठाउठीं ।तेही मातेंचि किरीटी । पावती गा ॥५८॥*
      आपल्याला मोबदल्यात देऊन त्वरित शून्य (निराकार ब्रह्म) घेतात, तेही अर्जुना मलाच पावतात.
*🍀वांचूनि योगचेनि बळें । अधिक कांहीं मिळे ।ऐसें नाहीं आगळें । कष्टचि तया ॥५९॥*
      एरवी योगाचरणाच्या जोरावर विशेष काही लाभ होतो असे मुळीच नाही. त्यात करणार्‍याला काही मिळत असेल तर जास्त श्रम मात्र पदरात पडतात, दुसरे काही नाही.
➖➖➖➖💠➖➖➖➖
*क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥५॥*
👉  _अव्यक्त ब्रह्माचे ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे त्यांना अधिक क्लेश असतो. कारण देहधार्‍यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो_
(योगमार्ग कष्टसाध्य)
➖➖➖➖🍀➖➖➖➖
*🍀जिहीं सकळ भूतांचिया हितीं । निरालंबीं अव्यक्तीं ।पसरलिया आसक्ती । भक्तीवीण ॥६०॥*
      सगुणाच्या भक्तीस डवलून निराश्रय निर्गुण, त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरता ज्या योग्याने त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳
🚩  *|जयजय रामकृष्ण हरि |*

error: Content is protected !!