प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा

नवचैतन्य टाईम्स मेढा प्रतिनिधी(अनिकेत पवार)-जिल्ह्यातील वृत्तपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांत काम करणार्‍या सर्व पत्रकारांना तसेच कार्यालयातील कर्मचार्‍यांना संचारबंदीत मुभा देण्यात आली आहे. वृत्तपत्र कार्यालयात अनेक विभाग असून त्याठिकाणी कर्मचारी काम करत असल्याने त्यांनाही संचारबंदीत वृत्तपत्रीय कामकाजासाठी घराबाहेर पडण्यास सवलत देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी जाहीर केले.यावर्षीच्या लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी रात्रीपासून संचारबंदी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत.वृत्तपत्रातील अधिस्वीकृती पत्रकारांनाच संचारबंदीतून वगळण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हटले होते. त्यामुळे सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सचिव दिपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, श्रीकांत कात्रे, राजेश सोळस्कर, दिपक शिंदे, चंद्रसेन जाधव यांच्यासह तुषार तपासे, विठ्ठल हेंद्रे, आदेश खताळ, संदीप राक्षे, साई सावंत, ओमकार कदम, सनी शिंदे, पद्माकर सोळवंडे, विशाल कदम यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेवून त्यांच्यासमवेत बैठक केली. केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांवर वृत्तपत्रांचे कामकाज चालत नाही. वृत्तपत्रातील व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व घटकांची संचारबंदीतून मुक्तता करणे आवश्यक असल्याचे पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना पटवून दिले.जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, मुख्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्स असून त्यामध्ये पत्रकारांचा मुद्दा मांडला जाईल.पूर्वीप्रमाणेच वृत्तपत्रे व कर्मचार्‍यांना परवानगी असेल, हे मी आत्ताच जाहीर करतो. शासनाने तेवढे अधिकार जिल्हापातळीवर ठेवले आहेत. याचा वापर करुन अधिकृत वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व पत्रकार व कर्मचार्‍यांना परवानगी देण्यात येईल, असेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी वृत्तपत्र कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांची व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कर्मचार्‍यांची अधिकृत यादी माझ्याकडे पाठवण्यात यावी. मी जिल्हा पोलीसप्रमुखांशीही याबाबत चर्चा करेन, म्हणजेच जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांमधील कोणत्याही अधिकृत घटकाला अडचण येणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
बैठकीत संघाचे जिल्हाध्यक्ष हरीष पाटणे यांनी जिल्हाधिकार्‍यांचे आभार मानले. त्यानंतर माध्यमांसमवेत बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे वेगळा संदेश गेला होता. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनीही वृत्तपत्राचे आयकार्ड ग्राह्य मानून संचारबंदीत परवानगी द्यावी, अशी भूमिका घेतली होती. या भूमिकेला अनुसरुन सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकार्‍यांशी यशस्वी चर्चा केली. त्यानुसार आता वृत्तपत्रांचे कार्यालयांसह जिल्ह्यांमधील अधिकृत पत्रकार तसेच वृत्तपत्रीय सर्व कर्मचारी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार व कॅमेरामन यांना संचारबंदीत वृत्तपत्रीय कामकाजासाठी मुभा राहणार आहे. मात्र, कोरोना काळात पत्रकारांनी स्वत:ची काळजी घेवून पत्रकारिता करावी, असे आवाहनही हरीष पाटणे यांनी केले.विनोद कुलकर्णी म्हणाले, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व दैनिकांचे संपादक व संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकार्‍यांना भेटले. त्यांनी योग्य निर्णय घेतला. पत्रकारांना दिलासा देणारी ग्वाही जिल्हाधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे पत्रकारांना आता अडचण येणार नसून वेळप्रसंगी त्यांनी पदाधिकार्‍यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले.दीपक प्रभावळकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून स्लीप ऑफ टंग झाले असेल पण त्यांनी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच संचारबंदी काळात परवानगी असल्याचे सांगितले.सामान्य माणसाला वृत्तपत्रातील रिपोर्टिंग आणि एडिटिंग हे दोनच विभाग माहीत असतात. मात्र वृत्तपत्रात 14 विभाग असतात.जाहिरात,शेड्युलिंग,पब्लिशिंग अशा वेगवेगळ्या विभागात कर्मचारी काम करत असून त्यांची संख्या मोठी आहे.जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्या आहेत.संघटनेच्या एकजुटीचे हे यश आहे.

error: Content is protected !!