महाराष्ट्राशी हा भेदभाव कशासाठी? रोहित पवारांचा मोदी सरकारला सवाल
नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(मकसुद शेख)-करोना काळातील वैद्यकीय सुविधांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार टीका केली आहे.‘आर्थिक मदत असो किंवा वैद्यकीय मदत असो महाराष्ट्राशी भेदभाव कशासाठी? आर्थिक मदत देताना राजकारण केले जात असेल तर ते आपण समजू शकतो,परंतु संकट काळात वैद्यकीय मदत देतानाही राजकारण केले जात असेल तर याला काय म्हणावे? पक्ष,सत्ता हे जनतेपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे का? महाराष्ट्रात देशाचे नागरिक राहत नाहीत का? राजकारण केंद्रस्थानी ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळणे योग्य नाही.सद्यस्थितीला लोकांचे जीव वाचवणे ही प्राथमिकता असायला हवी,राजकारण नंतरही करता येईल,याचं भान मात्र ठेवायला हवं,असं म्हणत फेसबुक पोस्टद्वारे रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.तसेच रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर घणाघाती आरोप करत टीका केली आहे‘राज्यावर केंद्राकडून अन्याय होत असताना गप्प बसायचे आणि राज्य सरकारची कोंडी होत असताना त्याचे भांडवल करून राजकारण करायचे ही राज्यातील विरोधी पक्षाची भूमिका महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही,’असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना रोहित पवार यांनी आक्रमक शब्दांत उत्तर दिलं आहे.‘काही लोक म्हणतील की मी फक्त केंद्र सरकारवर टीका करतो.पण तसं नाही.अनेकवेळा मी चांगल्या निर्णयांसाठी केंद्र सरकारचं अभिनंदन केलं आणि आभारही मानले आहेत. पण काही चूक असेल तर त्यावर बोलायचंच नाही का? तर लोकशाहीमध्ये तसं होत नसतं.चुकीला चूक म्हणण्याचं आणि चांगल्या गोष्टीचं कौतुक करण्याचा उमदेपणा आमच्यात आहे. काहीजण तर थेट पात्रतेपर्यंत खाली घसरतात पण अशा लोकांचा मी विचार करत नाही आणि मला त्यांचा विचार करण्याची गरजही नाही.माझी पात्रता ही जनता ठरवेल. त्यामुळं आजवर मी जनतेच्या आणि राज्याच्या हिताचे मुद्दे मांडत आलो आहे आणि यापुढंही मांडतच राहील,यात काही संशय नाही,असं रोहित पवार म्हणाले.