सातारा जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या अहवालास उशीर लागतोय

नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(जयवंत मोरे)
●चाचणी केलेल्यांचा जीव टांगणीला
●स्वॅब घेेतल्यानंतर दोन दिवसात अहवाल अपेक्षित
●जिल्ह्यात 24 तासात वाढले 799 रूग्ण
●11 हजार 153 चाचण्या
जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीचा आलेख कमी करण्यासाठी नियोजन करतानाच स्थानिक पातळीवरील प्रशासनालाही वारंवार सुचनांचा टेकू देणे गरजेचे झाले आहे. कराड तालुक्यात एका बाजूला रूग्णवाढीचा वेग कायम असताना आता दुसरीकडे मृत्यू संख्याही वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या नागरिकांचे निगेटिव्ह की पॉझिटिव्ह चे अहवाल चार दिवसांपेक्षा जास्त उशीराने येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे चाचणी केलेल्या संशयिताचा जीव टांगणीला लागतो. असे प्रकार घडत असल्याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात 11 हजार 153 संशयितांच्या चाचण्या केल्या त्यापैकी 799 रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
*जिल्हाधिकारी म्हणतात…गर्दीत नियमांची पायमल्ली*
सातारा जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या कमी होताना दिसत नाही.त्यामुळे प्रशासन हतबल झाले असून नागरिकांचा हलगर्जीपणाही नडतोय. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी गुरूवारी जिल्हावासियांशी संवाद साधताना गेल्या पंधरा दिवसातील पॉझिटिव्हीट रेट कसा वाढला आणि कसा कमी झाला याचा आढावा सांगितला. हे सांगतानाच त्यांनी गर्दी, सार्वजनिक ठिकाणी नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे स्पष्ट करताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंंघन होत असल्यानेच आकडे वाढत असल्याचे सांंगितले. त्यामुळे आज आठवड्याच्या अहवालावर चर्चा होऊन राज्यशासनाच्या सुचनांप्रमाणे जिल्ह्यातील निर्बंधांचे काय करायचे याचा निर्णय होईल.
*कारवाई थंडावली…आओ जाओ कोरोना तुम्हारा*
जिल्ह्यात यापुर्वी कडक लॉकडाऊन काळात पोलीस, नगरपालिका, ग्रामपंचायतींनी विनाकारण फिरणारे, मास्क न घालणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मोहिम सुरू ठेवली होती. मात्र अलिकडच्या महिनाभरात या मोहिमेत ढिलाई आली आहे. दुपारी 2 नंतर संचारबंदी असतानाही रस्त्यावरील गर्दी हटत नाही. प्रशासनही हे पाहून हाताची घडी तोंडावर बोट या भुमिकेत दिसते. त्यामुळे दुपार नंतरची संचारबंदी हा केवळ कागदी नियम झाला आहे. कोरोना रोखायचा असेल तर नियम केले तर त्याची अमलबजावणी करा अन्यथा सर्व खुले तरी करा अशी संतप्त प्रतिक्रिया काटेकोर नियम पाळणारांकडून व्यक्त होत आहे.
*गुरूवारी जिल्हय़ात*
एकूण बाधित 799
एकूण मुक्त 1009
एकूण बळी 20
*गुरूवारपर्यंत सातारा जिल्हय़ात*  
एकूण नमूने 1227926  
एकूण बाधित 206890
घरी सोडलेले 192848  
मृत्यू -4986  
उपचारार्थ रुग्ण-10893

error: Content is protected !!