“आज बैलपोळा वर्षभर बळीराज्याच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलाप्रती सध्दभावना व्यक्त करण्याचा दिवस”
नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(कदिर मणेर)शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उस्साहात साजरा करतो.भारत हा कृषीप्रधान देश आहे.कृषी संस्कृती हा देशाचा प्राण आहे.महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. कृषीसंस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसूकच येतात.आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे बेंदूर. महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो.मात्र,प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो. शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उस्ताहात साजरा करतो.
कसा साजरा करतात बेंदूर सण?
बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत बहुतांशपणे सारखीच आहे. मात्र, बेंदूर हा सण आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. तर, पोळा किंवा बैल पोळा हा सण श्रावण अमावास्येला साजरा केला जातो. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळीनंतर बैलांना खायला दिली जाते.
बैलांची खांदे मळणी
बैलांच्या वशींडापासूनचा पुढील भाग आणि मानेच्या वरचा भाग म्हणजे खांदा. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. खांदेमळणी ही सुद्धा विशेष असते. यावेळी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. म्हणजेच बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते. शेतकरी बांधव या दिवशी बैलांची सेवा करतात.
बैलांची मिरवणूक
बैल आणि अन्य जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो. दुपारनंतर बैलाला सजवले जाते. त्यांच्या शिंगांना छान रंग दिला जातो. अंगावर झूल घालतात. बेगड्या चिटकवल्या जातात. डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगरांची माळ घातली जाते. यादिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलांना घातला जातो. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले जातात. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते. करोना संकटामुळे यंदा बैलांची मिरवणूक काढली जाणार नसल्याचे समजते.
परंतू काही शेतकरी वर्गाशी संपर्क केला असता ते म्हणतात शेतकरी राजा मात्र आपल्या सर्जा-राजाचा सण मोठ्या वाजत गाजत का नसेना मात्र उत्साहात रुढी-परंपरेने साजरा करतोच.