संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🌻  *अध्याय पहिला*
🚩  *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌻 *||अर्जुनविषादयोग* 
🍀 *ओवी २६१ ते २७५*
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
*💠पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतीही उगंडु नाही। येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥*
     अर्जुन म्हणतो, त्या नरकात पडल्यावर मग कल्पांतीही तेथून सुटका होत नाही. इतका या कुलक्षयाने अःधपात होतो.
*💠देवा हें विविध कानीं ऐकिजे । परि अझुनिवरी त्रासु नुपजे ।हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारी पां॥ २६२ ॥*
      देवा, हे सर्व आपल्या शास्त्रातील वचने ऐकून  आपण त्याचा विचारही करू नये का? की तरीही आपण ह्रदय वज्राचे बनवून कुलक्षयास तयार व्हावे काय? याचा जरा विचार करावा. 
*💠अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक ।ऐसे जाणतांही दोष । अव्हेरू ना॥ २६३ ॥*
      शिवाय हा कुलक्षय करून जे राज्य सुख या शरीराला मिळेल ते हे शरीरही क्षणिक आहे (शरीर  मरणारेच आहे) हे जाणूनही मग या कुलक्षयाचा विचार सोडून देऊ नये का?
*💠हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेकुलें । घडले आम्हा॥ २६४ ॥*
     आमचे हे सर्व वडील, आप्तेष्ट, नातेवाईक  यांच्याकडे, त्यांचा वध करण्याच्या हेतूने मी पाहिले,  हेच मोठे पाप माझ्याकडून घडले नाही का? पहा बरे देवा.
➖➖➖➖⛳➖➖➖➖
*🚩यदि मामप्रतीकारमशस्त्रतं शस्त्रपाणयः| धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तनं मे क्षेमतरं भवेत् ॥ ४६ ॥*
अर्थ 👉  _जर प्रतिकार न करणार्‍या आणि नि:सस्त्र अशा मला, हातात शस्त्रे धारण करणारे कौरव रणामधे ठार मारतील तर माझे कल्याण होईल_
➖➖➖➖⛳➖➖➖➖
*💠आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवे।जे शस्त्र सांडूनि साहावे । बाण त्यांचे॥२६५ ॥*
     तर आता, जिवंत  राहण्यापेक्षा आपली शस्त्रे  टाकून देऊन कौरवांचे बाण सहन करावे हे बरे !
*💠तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें।परी येणें कल्मषें । चाड नाहीं ॥ २६६ ॥*
    असे केल्यास, जरी मरण प्राप्त झाले तरी चांगले  परंतु त्यांचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही.
*💠ऐसें देखोनि सकळ । अर्जुनें आपुलें कुळ। मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु॥ २६७ ॥*
     याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हटले की, यांचा क्षय करून राज्य मिळविणे म्हणजे केवळ  नरकाची जोड करणे होय.
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🚩संजय उवाच :एवमुक्तवार्जुन: संख्ये रथोपस्य उपाविशत्।विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ ४७ ॥*
अर्थ 👉   _संजय म्हणाला, – रणामधे याप्रमाणे बोलून शोकाने ज्याचे चित्त व्यापले आहे असा अर्जुन धनुष्य आणि बाण टाकून रथाखाली उडी टाकून रथाच्या मागच्या भागाजवळ बसला._
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*💠ऐसें तिये अवसरीं । अर्जुन बोलिला समरीं ।संजयो म्हणे अवधारी । धृतराष्ट्रातें॥ २६८ ॥*
    हा सर्व श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद, संजय राजा धृतराष्ट्राला सांगत आहे.
*💠मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहिंवरू आला। तेथ उडी घातली खालां । रथौनियां॥२६९॥*
    अर्जुन अत्यंत गहिवरला, उदासीन झाला आणि त्याने रथातून खाली उडी टाकली.
*💠जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहृतु । कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥ २७० ॥*
     ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत झाला, की तो सर्वथा निस्तेज होतो किंवा राहूच्या योगाने सूर्यास ग्रहण लागते.
*💠ना तरी महासिद्धीसंभ्रमें । जिंतला त्रासु भ्रमे । मग आकळुनि कामें । दीनु कर्जे ॥ २७१ ॥*
     किंवा महासिद्धिच्या प्राप्तीने तपस्वी व्यापला म्हणजे तपाचा त्याग करून कामाच्या सपाट्यात सापडून दीनतेस प्राप्त होतो.
*💠तैसा तो धनुर्धरु । अत्यंत दुःखें जर्जरु।दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें २७२॥*
     तसा तो धनुर्धारी अर्जुन रथातून खाली उतरला; त्यावेळी तो दुःखाने अतिशय व्याकुळ दिसू लागला. 
*💠मग धनुष्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले। ऐसें ऐके राया तेथ वर्तलें । संजयो म्हणे॥ २७३ ॥*
    संजय सांगतो राजा ऐक, अर्जुनाने धनुष्यबाण  टाकून दिले आहे आणि त्याच्या डोळ्यातून आपोआपच अश्रुधारा चालल्या आहेत. 
*💠आता यावरी तो वैकुंठ्नाथु । देखोनि सखेद पार्थु।कवणेपरी परमार्थु । निरुपील ॥२७४॥*
     आता अशा या दुःखी अर्जुनास वैकुंठनाथ  श्रीकृष्ण कशा रितीने तत्वज्ञानाचा बोध करतील. 
*💠ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां। ज्ञानदेव म्हणे आतां निवृत्तिदासु॥२७५ ॥*
     ती पुढे येणारी सविस्तर कौतुककारक कथा उत्सुकतेने  ऐका, असे निवृत्तिदासु ज्ञानेश्वर महाराज  सांगतात.  
*अशा प्रकारे श्रीमद्भगवद्गीतोपनिषदातील श्रीकृष्णार्जुन संवादरूपातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील* (कर्मयोगशास्त्रातील)  *अर्जुनविषादयोग* *नावाचा प्रथम अध्याय समाप्त.*
*।।🕉 तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु ।।*
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
*_||जय जय रामकृष्ण हरि ||_*
*_प्रथम अध्याय समाप्त_*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

error: Content is protected !!