संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा
🚩 नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🌹 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🍀 *अध्याय २ रा*
🚩 *ओवी २६० पासून*
🌹 *¦¦सांख्ययोग¦¦*
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
*🌻यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके |तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ||२-४६||*
अर्थ 👉 _सर्वत्र पाणीच पाणी जरी झाले तरी आपणास जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे, त्याप्रमाणे ज्ञानी, संपूर्ण विचार करून त्यातील अपेक्षित जे शाश्वत तत्व त्याचे ग्रहण करतात_
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌷जरी वेदें बहुत बोललें । विविध भेद सूचिले ।तर्ही आपण हित आपुलें । तेंचि घेपे॥ २६० ॥*
जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. अनेक प्रकारचे साधन मार्ग सुचविले आहेत, तरी *आपण त्यातील आपले हित ज्यात आहे तेच घ्यावे*.
*🌷जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती ।तरी तेतुलेही काय चालिजती । सांगे मज॥२६१*
जसे सूर्योदय झाला की जाणारे सर्वच रस्ते नजरेस पडतात म्हणून आपण त्या सर्व रस्त्यावर चालत नाही.
*🌷का उदकमय सकळ । जर्ही जाहलें असे महीतळ।तरी आपण घेपे केवळ । आर्तीचजोगें॥२६२॥*
अथवा सर्व भूतल जरी जलमय झाले असले तरी आपण आपल्याला हवे तेवढे पाणी घेतले पाहिजे.
*🌷तैसे ज्ञानिये जे होती । ते वेदार्थाते विवरिती।मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें॥२६३॥*
त्याप्रमाणेच जे ज्ञानी आहेत, ते विचारवान मुमुक्षू आहेत. ते वेदार्थाचा विचार करतात आणि *आपल्याला अपेक्षित अशा शाश्वत ब्रह्मतत्वाचाच स्वीकार करतात*.
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌻कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ||२-४७||*
अर्थ 👉 _तुला फक्त कर्माविषयी अधिकार आहे, कर्मफलाविषयी तू इच्छा धरता कामा नये. म्हणजे तू कधी कर्मफलाला हेतूभूत होता उपयोगी नाही. आणि कर्म न करण्याविषयी मनाचा कल होऊ देऊ नकोस_
(सूत्ररूपाने कर्मयोग पुढे)
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌷म्हणौनि आइकें पार्था । याचिवरी पाहतां।तुज उचित होय आतां । स्वकर्म हें॥२६४॥*
म्हणून अर्जुना, या सर्व गोष्टींचा विचार करून पाहिले असता तुला आता स्वकर्मच उचित निश्चित फलप्रद आहे.
*🌷आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें ।जे न संडिजे तुवा आपुलें । विहित कर्म॥२६५॥*
आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून असे दृष्टीस आले की आपले विहीत कर्म आपण कधीही सोडू नये.
*🌷परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मी संगति न व्हावी ।हे सत्क्रियाचि आचरावी।हेतूविण॥२६६॥*
मात्र हे *विहीत कर्म करताना, या कर्माचे हेच फल मिळेल ही इच्छा ठेवू नये*. आणि निषिद्ध कर्माचे आचरण होऊ नये. म्हणून या सत्कर्माचेच निष्काम वृत्तीने आचरण करावेस .
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌻योगस्थः कुरु कर्माणि सङ्गंत्यक्त्वा धनंजय |सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ||२-४८|*
अर्थ 👉 _अर्जुना, योगयुक्त होऊन, फलाची संगती टाकून तू चित्त देऊन कर्मे कर. पूर्ण व अपूर्ण कर्माविषयी जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग असे म्हणतात_
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌷तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संग सांडुनी ।मग अर्जुना चित्त देऊनी । करीं कर्में ॥२६७॥*
अर्जूना तू *निष्काम कर्मयोगाने युक्त होवून फलाची इच्छा टाकून मन लावून वेदविहीत कर्मे करावीत*.
*🌷परी आदरिले कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे।तरी विशेषें तेथ तोषावें । हेही नको ॥२६८॥*
आणि आरंभिलेले कर्म दैवयोगानेच यथासांग पूर्ण झाले. तरी त्याचा विशेष संतोष मानू नये.
*🌷कां निमित्तें कोणे एकें । तें सिद्धी न वचतां ठाकें।तरी तेथिंचेनि अपरितोखें।क्षोभावें ना॥२६९॥*
किंवा कोणत्याही कारणाने ते कर्म सिद्धीस न जाता तसेच राहिले तरी त्याबद्दल मनात असंतोष मानून त्रासही करून घेऊ नये.
*🌷आचरता सिद्धी गेलें ।तरी काजाचि कीर आलें।परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं|२७०|*
आरंभिलेले कर्म करताना जर ते शेवटास गेले सफल झाले तर ते खरोखर आपल्या उपयोगाला आले; परंतु कदाचित काही विघ्ने येऊन जर कर्म अपुरे राहिले, तरीही ते सफलच झाले असे समज.
*🌷देखें जेतुलालें कर्म निपजे ।तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे ।तरी परीपूर्ण सहजें । जहालें जाणे॥२७१*
कारण की, *जेवढे म्हणून आपल्या हातून कर्म घडेल, ते सर्वच ईश्वरचरणी अर्पण केले म्हणजे सहजरीत्या पूर्णच झाले.*
*🌷देखें संतासंती कर्मीं । हें जे सरिसेपण मनोधर्मीं ।तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे॥२७२॥*
आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योगस्थिती आहे. निष्काम कर्मयोग. तिलाच ज्ञानी पुरुष वाखाणतात.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳
🌹 *ओवी २७३पासून उद्या*
🌿 *¦¦जयजय रामकृष्ण हरि¦¦*