संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🌹 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌸 *अध्याय ८ वा*
🌹 *।।अक्षरब्रह्म योग।।*
🍀 *ओवी ११ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳
*🌸परि ऐंसे जें प्रेम ।अर्जुनींचि आथि निस्सीम ।म्हणऊनि तयाचे काम ।सदा सफळ ॥११॥*
     परंतु अशा प्रकारचे जे निस्सीम प्रेम, ते एक अर्जुनाच्या ठिकाणीच अमर्याद अाहे, म्हणून त्याच्या मनोकामना नेहमी पूर्ण होतात. 
*🍀या कारणे श्रीअनंते ।तें मनोगत तयाचें पुसतें ।होईल जाणूनि आइतें ।वोगरूनि ठेविलें ॥१२॥*
    म्हणूनच, अर्जुन हा आता आपल्या मनातील गोष्ट मला विचारील, असे जाणून श्रीकृष्णांनी आयतेच उत्तराचे ताट वाढून ठेविले. 
*🌸जें अपत्य थानी निगे ।त्याची भूक ते मातेसीचि लागे ।एऱ्हवीं तें शब्दें काय सांगे ।मग स्तन्य दे येरी ॥१३॥*
    स्तनपान करून दूर खेळत असलेल्या बालकाला भूक लागली आहे, हे त्याच्या आईलाच समजते. नाही तर त्याने मागितल्यावर मग का ती त्याला दूध पाजते? 
*🍀म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायी ।हे नवल नोहे कांही ।परि तें असो आइका काई ।जें देव बोलते जाहले ॥१४॥*
   अर्थात कृपाळू अशा सद्गुरूचे ठिकाणी (आपल्या शिष्यासंबंधी) असले हे प्रेम असणे म्हणजे काही नवल नव्हे. पण हे असो; देव जे काही बोलले ते ऐका
➖➖➖➖🌹➖➖➖➖
*🌻अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित ॥३॥*
अर्थ 👉 _श्रीकृष्ण म्हणाले जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म. ब्रह्माच्या आकाराच्या उत्पत्ति-विनाशाबरोबर उत्पन्न व नष्ट न होणे ही जी सहज स्वरूपस्थिती तिला अध्यात्म असे म्हणतात. अक्षर ब्रह्मापासून भूतमात्रादी चराचर पदार्थांची उत्पत्ती करणारा जो विसर्ग म्हणजे सृष्टिव्यापार त्याचे नाव कर्म होय_
( परब्रह्म व्याख्या) 
➖➖➖➖🌹➖➖➖➖
*🌸मग म्हणितले सर्वेश्वरें ।जें आकारी इये खोंकरें ।कोंदलें असत न खिरे ।कवणे काळी ॥१५॥*
    मग सर्वेश्वर म्हणाले – जे या फुटक्या आकारात (देहात) ओतप्रोत भरलेले असून कोणत्याही वेळी नाश पावत नाही 
*🍀एऱ्हवीं सपूरपण तयाचें पहावें ।तरि शून्यचि नव्हे स्वभांवें ।वरि गगनाचेनि पालवे ।गाळूनि घेतलें ॥१६॥*
    बरे, त्याचा सूक्ष्मपणा पहावा तर स्वभावतः ते शून्य नव्हे, पण अति पातळ अशा आकाशाच्या पदराने गाळून घेतलेले आहे; 
*🌸जें ऐसेंही परि विरूळें ।इये विज्ञानाचिये खोळे ।हालवलेंही न गळे ।ते परब्रह्म ॥१७॥*
    अशा प्रकारचे जे विरळ आहे व जे प्रापंचिक ज्ञानाच्या मोटेतून (शरीरातून) हालवले असताही गळत नाही, त्याला ‘परब्रह्म’ असे म्हणतात.
*🍀आणि आकाराचेनि जालेपणें ।जन्मधर्मातें नेणे ।आकारलोपीं निमणें ।नाहीं कहीं ॥१८॥*
    आणि आकार म्हणजे शरीर हे जन्मास आल्याने त्याचे जे धर्म त्याला जे जाणत नाही व ते शरीर नाश पावल्यावरही जे कधी नाश पावत नाही,
*🌸ऐशिया आपुलियाची सहज स्थिती ।जया ब्रह्माची नित्यता असती ।तया नाम सुभद्रापति ।अध्यात्म गा ॥१९॥*
    हे सुभद्रापते, अशा रीतीने ज्या ब्रह्माची आपल्याच ठिकाणी निरंतर सहज स्थिती असते, त्याला अध्यात्म असे म्हणतात.
*🍀मग गगनी जेविं निर्मळें।नेणों कैंची एक वेळे।उठती घनपटळे।नानावर्णे॥२०॥*
    मग, निर्मळ आकाशात नाना रंगाचे ढग एकदम कसे उत्पन्न होतात हे ज्याप्रमाणे कळत नाही 
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳
🔰 *ओवी २१ पासून उद्या*
🔰 *¦जयजय रामकृष्ण हरि¦*

error: Content is protected !!