संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
*9820375869*
🌸 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🍃 *अध्याय ८ वा*
🌸 *।।अक्षरब्रह्म योग।।*
🍃 *ओवी १०१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
➖➖➖➖🌲➖➖
*🌴चंडवातेंही न मोडे ।तें गगनचि कीं फुडें ।वांचूनि जरे होईल मेहुडें ।तरी उरेल कैंचे ॥१०१॥*
     झंझावाताने न मोडणारे असे एक खरोखर गगनच आहे; त्याच्याशिवाय, त्या वाऱ्यापुढे ढग आले असता कसे टिकतील ?
*🌴तेविं जाणणेया जें आकळिलें ।तें जाणवलेपणेंचि उमाणलें ।मग नेणवेचि तया म्हणितलें ।अक्षर सहजें ॥१०२॥*
     त्याचप्रमाणे, ज्ञान्याला जे समजले ते ज्ञानाच्या मापात आले म्हणून ते क्षर (नाशवंत) होय; मग, जे जाणण्यास अशक्य, त्याला सहज अक्षर (अविनाशी) असे म्हणतात.
*🌴म्हणोनि वेदविद नर।म्हणती जयातें अक्षर।जें प्रकृतीसी पर।परमात्मरूप||१०३||*
      म्हणून वेदपारंगत पुरुष ज्याला अक्षर (ब्रह्म) असे म्हणतात, व जे मायेच्या पलीकडील असून सच्चिदानंदरूप आहे,
*🌴आणि विषयांचें विष उलंडूनि ।जे सर्वेंद्रियां प्रायश्चित देऊनि ।आहाति देहाचिया बैसोनि ।झाडातळी ॥१०४॥*
     आणि विषयांची इच्छा टाकून व सर्व इंद्रियांचे दमन करून देहरूपी झाडाच्या तळी उदासीनवृत्तीने बसलेले 
*🌴ते यापरी विरक्त ।जयाची निरंतर वाट पाहात ।निष्कामासि अभिप्रेत ।सर्वदा जें ॥१०५॥*
      त्याप्रमाणे विरक्त पुरुषही ज्याची नेहमी वाट पहात असतात व जे नेहमी निरिच्छ लोकांना आवडते, 
*🌴जयाचिया आवडी ।न गणिती ब्रह्मचर्यादि सांकडी ।निष्ठुर होऊनि बापुडी ।इंद्रिये करिती ॥१०६॥*
     ज्याच्या आवडीकरिता योगीजन ब्रह्मचर्यादि संकटे जुमानीत नाहीत व निष्ठुरपणे इंद्रियांना दीन करतात, 
*🌴ऐसें जें पद| दुर्लभ आणि अगाध| जयाचिये थडिये वेद| चुबुकळिले ठेले ||८-१०७||*
     असे जे ठिकाण (ब्रह्मस्वरूप) जे मिळावयास कठिण व जाणण्यास कठिण व ज्याच्या अलिकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत वेदासही जे अगम्य आहे.
*🌴तें तें पुरूष होती ।जे यापरी लया जाती ।तरी पार्था हेचि स्थिती ।एक वेळ सांगो ॥१०८॥*
     असे जे दुर्लभ पद – ज्याचा अंत नाही व जे वेदालाही जाणता आले नाही, त्या पदाला, मी सांगितल्याप्रमाणे जे देह ठेवतात, ते प्राप्त होतात, म्हणून, पार्था, त्याबद्दल आणखी एकवार तुला सांगतो.
*🌴तेथ अर्जुनें म्हणितलें स्वामी ।हेंचि म्हणावया होतों पां मी ।तंव सहजें कृपा केली तुम्ही ।तरी बोलिजो कां ॥१०९॥*
      त्या वेळेस अर्जुन म्हणतो, “हे गुरो, मी आपल्यास आता हेच विचारणार होतो, तो आपण मजवर कृपा केली. तर आता सांगण्यास सुरवात करावी; 
*🌴परि बोलावें तें अति सोहोपें ।तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें ।तुज काय नेणों संक्षेपें ।सांगेन ऐक ॥११०॥*
     परंतु काय सांगावयाचे ते अगदी सोप्या रीतीने मात्र सांगा.” त्या वेळी, त्रिभुवनदीप जे श्रीकृष्ण ते म्हणाले :- तुला का आम्ही ओळखीत नाही? तुला संक्षेपाने सांगतो. 
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳
🌸 *ओवी १११ पासून उद्या*
🍃 *¦जयजय रामकृष्ण हरि¦*

error: Content is protected !!