राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन, स्वतःला सिद्ध करा:- पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले

नवचैतन्य टाइम्स जत:प्रतिनिधी:- विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात कष्ट करून करिअरवर लक्ष दिले पाहिजे. चांगल्या सवयी अंगी बाळगून आपले व्यक्तिमत्त्व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक चांगला नागरिक घडून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे मत पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या (मौजे बनाळी, जत) उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.याप्रसंगी पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे, महाविद्यालयाचे सकाळ सत्राचे प्रभारी प्रा. सिद्राम चव्हाण, दुपार सत्राचे प्रभारी महादेव करेन्नवर, सरपंच सौ. विद्या सावंत, सौ. अनिता सावंत, कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय जाधव, प्रा. पुंडलिक चौधरी, प्रा. तुकाराम सन्नके व डॉ. राजेंद्र लवटे उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे म्हणाले की, श्रमसंस्कार शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता, सामाजिक जबाबदारी, एकता, एकात्मता व विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल व सुधारणा करावी. यावेळी महाविद्यालयाच्या सकाळ सत्राचे प्रभारी सिद्राम चव्हाण म्हणाले की, महाविद्यालयाचे विद्यार्थी इथून पुढे सात दिवस बनशंकरी मंदिर परिसर स्वच्छ करून विविध उपक्रम घेऊन संपूर्ण ग्रामस्थांचे समाज प्रबोधन करतील. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना आव्हान केले की, पुढील सात दिवस विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरवून सहकार्य करावे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात अनिता सावंत म्हणाल्या की, महाविद्यालयाची माजी विद्यार्थी व बनाळी गावची नागरिक म्हणून अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की, एक आदर्श व सक्षम तरुण पिढी महाविद्यालयात तयार केली जाते याचा मनस्वी अभिमान वाटतो.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व शिक्षक सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, स्वयंसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत सिद्राम चव्हाण, प्रास्ताविक पुंडलीक चौधरी, सूत्रसंचालन तुकाराम सन्नके तर आभार डॉ. विजय जाधव यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!