युती-महाआघाडीचं घडतंय-बिघडतंय!

नवचैतन्य टाईम्स वार्तापत्र -युती आणि महाआघाडीची घोषणा होता होता थांबते आहे. सर्व एकमेकाबाबत साशंक आहेत. विळय़ा-भोपळय़ाची मोट बांधण्याचा अट्टहास तरीही होत आहे, तो सर्वांच्याच अपुऱ्या बळामुळेगुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा लगबगीने मातोश्रीवर गेले तेव्हा शुक्रवारपर्यंत युतीची घोषणा होईल असे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्यक्षात घोषणा रेंगाळली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप नक्की झाले आहे पण त्यांनीही घटकपक्षांसाठी घोषणा पुढे ढकलली. गेले चार दिवस हेच सुरू आहे.45 जागा जिंकण्याच्या भाजपच्या घोषणेनंतर सेनेने तीव्र भूमिका घेतली. पाठोपाठ अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी स्वतःच तडजोडीची चर्चा करणे, भाजपला शिवसेनेने 48 तासांचा अल्टिमेटम देणे, मुख्यमंत्र्यांनी तातडीने मातोश्रीची वारी करणे, काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतःच्या जागा वाटपाचा निर्णय थांबवून प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांना आपल्या तंबूत ओढण्यासाठी धावाधाव करणे अशा गोष्टींना गेल्या तीन दिवसात प्रचंड गती आली. याचे कारण, महाराष्ट्राचे दिल्लीच्या सत्तेत महत्त्वाचे योगदान असणार आहे. भाजपला उत्तर भारत आणि हिंदी पट्टय़ात 2014 ला जे अभूतपूर्व यश मिळाले ते आता मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांना जागा वाढवून मिळतील अशी अपेक्षा 48 मतदारसंघांच्या महाराष्ट्राकडूनच आहे. त्यासाठी त्यांना शिवसेनेची साथ मोलाची वाटते आहे. त्यामुळेच निम्म्या-निम्म्या जागा, लोकसभेबरोबर विधानसभा, राज्यात जादा जागा असतील त्यांच्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची वाटणी अशा अटीनंतरही ते निर्णयाप्रत आले आहेत. पण, तिढा सुटलेला नाही. शिवसेनेला प्रिय असणारा रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडची राणेंनी मुद्दामहून केलेली मागणी, राहुल शेवाळेंच्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावर रामदास आठवलेंचा दावा, रामटेकचे खासदार तुमानेंच्या पक्षबदलाची चर्चा, दुसरीकडे शिवसेनेचा जळगाव, पालघर, भिवंडी या भाजपच्या जागांवरील दावा असे काही अडथळे आहेत. आठवले, राणे, जानकर, मेटे, सदाभाऊ खोत हे भाजपचे मित्रपक्ष असून लोकसभा विधानसभेला त्यांची तिकीटे भाजपने स्वतःच्या कोटय़ातून द्यावीत, शिवसेना त्यांना जबाबदार नाही ही सेनेची अट. यामुळे बोलणी रखडल्याची चर्चा होती. पण काही वादग्रस्त विषयांना वळसा घालून लोकसभेच्या 25 जागा भाजपाला, 23 शिवसेनेला, भाजपच्या वाटय़ाची एक राज्यसभेची जागा सेनेला शिवाय विधानसभेला झुकते माप अशी तडजोड झाल्याची चर्चा होती. मात्र गुरुवार रात्रीची ही चर्चा शुक्रवारची दुपार होण्यापूर्वी विरून गेली. काही जागा आणि विधानसभा निवडणुकीबाबत एकमत होत नाही अशी चर्चा सुरू झाली आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी युतीची चर्चा पुढे ढकलली गेल्याचे संकेत दिले. सरकारला पाकिस्तानवर हल्ला करण्याचा सल्ला देऊन त्यांनी पत्रकारांना मातोश्रीवरून परत पाठवले.

भाजपप्रमाणे काँग्रेसलाही हिंदी पट्टय़ात स्वतःपेक्षा सप, बसप, राजद यांच्या जागा वाढणार असतील तर त्याची भरपाई महाराष्ट्रातूनच करायची आहे. राष्ट्रवादीशी त्यांनी आधीच जुळवून घेतले होते. आता राज ठाकरे यांच्या मनसेलाही जोडून घेण्यावर दिल्लीत विचार सुरू आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्या मागण्यांवरही गांभिर्याने निर्णयाच्या स्थितीत ते आहेत. देशात त्रिशंकु स्थिती निर्माण होऊ शकते या शक्यतेने प्रादेशिक पक्षांची जुळवाजुळव ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 6 जनपथ निवासातून होत आहे. यंदा पंतप्रधानपद त्यांना खुणावत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासाठी पवार परिवाराने आग्रह धरला, राजू शेट्टींशी जयंत पाटील यांनी चर्चा केली. प्रकाश आंबेडकर यांच्या आरएसएसने सरदार पटेल यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यास कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या ड्राफ्टला संमती दर्शवत काही जागांवर विचार होऊ शकतो अशी आशा त्यांनी तिकीट जाहीर केले तरी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र असा सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा ठरत असताना इथल्या प्रत्येक एक गठ्ठा मताला आणि वेगवेगळय़ा मतपेढय़ांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रत्येक पक्षाला महत्त्व येणे ओघानेच आले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप ठरले असले तरी घटक पक्षासाठी ते चार दिवस थांबणार आहेत. त्यासाठी आंबेडकरांचे शब्द आणि राजू शेट्टींचे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांविरोधातील आंदोलनही ते सहन करत आहेत. राज ठाकरे यांना सोबत घेतल्याने मुंबईतील हिंदी मतदार दुखावेल का?, प्रकाश आंबेडकरांवर ओवेसी फ्री मिळणार असल्याने ही फुकटची धोंड गळय़ात अडकवून घ्यायची का? यावर काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत नाही. तरीही काँग्रेस आणि गांधी घराण्याने देशभर घेतलेली लवचिक भूमिका लक्षात घेता काही बाबतीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेते चार पावले माघारी येतील अशी चिन्हे आहेत. पण, राजू शेट्टी किंवा आंबेडकर यांना खरोखरच महाआघाडीत जायचे आहे का हा प्रश्नच आहे. कारण त्यांनी मागितलेल्या जागा देणे दोन्ही काँग्रेसला जवळपास अशक्य आहे. पण, मत विभाजन टाळणे ही त्यांचीही गरज बनलेली आहे. त्यामुळे त्यांनीही हार मानलेली नाही. वेगवेगळय़ा नेत्यांमार्फत ते प्रत्येकाला चर्चेत गुंतवू पहात आहेत. राष्ट्रवादीला शरद पवारांच्याबाबतीत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने पक्षफुटीच्या चिंतेतून मुक्ती मिळाली आहे. शिवाय भाजपने पवारांना टार्गेट करण्यात, बारामती आणि माढातही पराभव करू या भाजपच्या घोषणेतही राष्ट्रवादी आपला फायदाच पाहतो आहे. भाजपप्रमाणेच राष्ट्रवादीही आपल्या सर्व ज्येष्ठांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.

*ग्रामीण-शहरी वर्चस्वाचे गणित*

महाराष्ट्राचा निम्मा भाग ग्रामीण आहे. तिथे मोदी सरकारविरुद्ध नाराजी आहे. शिवाय ऐन निवडणूक हंगामात दुष्काळ तीव्र होऊन पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने राज्य सरकारही अडचणीत आहे. अशावेळी मतांची विभागणी ग्रामीण भागात भाजपला टाळायची आहे. शिवसेनेला मुंबईतले अस्तित्व कायम ठेवायचे आहे आणि राज्यात मिळालेल्या जागाही घालवायच्या नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीला आपल्याकडील शेतकरी, दलित, मुस्लिम या मतांना भरकटू द्यायचे नाही. त्यासाठी त्यांना ग्रामीण महाराष्ट्रात राजू शेट्टी, आंबेडकर हवे आहेत. शहरी मतदार संघांमध्ये थोडक्यात हुकणाऱ्या जागा वाचविण्यासाठी त्यांना राज ठाकरेही महत्त्वाचे वाटतात. शिवाय मोदी मुक्त भारताची संकल्पना सर्वात आधी त्यांनी मांडली होती. पूर्वी मोदींचे समर्थन करणारेही राज्यातील राजजी पहिले होते. त्यांचा चेहरा दाखवून अलीकडे बदललेल्या मतदारांना महाआघाडीला आकर्षित करायचे आहे. पण तरीही सर्वच जण एकमेकांबाबत साशंक आहेत आणि त्यामुळेच निर्णय लांबत आहेत.

error: Content is protected !!