श्री गुरुदेव आश्रमात स्वावलंबी कृषी समावेश कार्यक्रमाचे आयोजन- डॉ.अमृतानंद स्वामीजी.

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी -आकळवाडी,बालगाव, कात्राळ, आणि बोर्गीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री गुरुदेव आश्रम येथे गुरुवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 11 वाजता भव्य असे स्वावलंबी कृषी समावेश कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तसेच यावेळी विविध तृणधान्य प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी ज्ञानयोग आश्रम विजयपूरचे परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये आणि कणेरी मठ कोल्हापूरचे मठाधिपती परमपूज्य काडशिद्धेश्वर स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.यावेळी
परमपूज्य महास्वामीजीचे दर्शन आणि आशीर्वचनासह स्वावलंबी कृषी समावेश कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुदेव आश्रम सेवासमितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी डॉ.अमृतानंद स्वामीजी म्हणाले की, स्वावलंबी कृषी समावेश आणि तृणधान्याचे प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश म्हणजे तृणधान्यांचे आहारातील महत्त्व लक्षात आल्यावर जनतेकडून तृणधान्यांची मागणी वाढेल. त्यामुळे शेतकरी तृणधान्याच्या शेतीवर लक्ष केंद्रित करतील. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षम होतील. पौष्टिक तृणधान्य पिकांचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी येथील आश्रमात गुरुवार दिनांक १३जून रोजी विविध तृणधान्य प्रदर्शन आणि विक्री असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी श्री गुरुदेव आश्रमाचे डॉ.अमृतानंद स्वामीजी पुढे म्हणाले की, नाचणी, नागली, वरी इत्यादी बारीक तृणधान्यांमध्ये इतर तृणधान्यांच्या तुलनेत जास्त कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, ॲमिनो ॲसिड, व्हिटॅमिनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या पिकांकडे कानाडोळा करुन चालणार नाही. तृणधान्यांमधील हे घटक शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवितात आणि मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या आजारापासून दूर ठेवतात. त्यामुळे आहारात त्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. म्हणूनच पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन आणि विक्री असे कार्यक्रम ठेवण्यात येत आहे. निरोगी आरोग्यासाठी नियमित आहारात नाचणी, वरीसारख्या तृणधान्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!