जत नगरपरिषदेचा अजब कारभाराचा कळस; शौचालय चौकशीचा फोन थेट जत पूर्व भागात:- विक्रम ढोणे यांचा घणाघाती आरोप

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी –
जत नगरपरिषदेच्या बहुचर्चित शौचालय घोटाळा जिल्हाभर गाजत असून त्याची स्थानिक पातळीवर सध्या चौकशी सुरू आहे.यातून धक्कादायक माहिती पुढे येत असून जत पूर्व भागातील २३ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मात्र जतमध्ये रहिवाशी नसणाऱ्या गावातील एका व्यक्तीच्या नावावर शौचालय बांधकाम केल्याचे उघड झाले असून त्या व्यक्तीला नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याने फोन करून आपण शौचालय कोठे बांधले आहे असा प्रश्न विचारला गेला आहे. यावरून जत नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती युवक नेते विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, सन २०१६-१७ या कालावधीत जत नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत अभियान योजना शासकीय योजनेतून राबविण्यात आली. योजनेचा उद्देश चांगला जरी असला तरी या शौचालय योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागावी हे दुर्देव आहे.जत पूर्व भागातील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीने मला नगरपरिषद मधून फोन आला व सांगितले की आपले यादीत नाव असून आपण शौचालय कोठे बांधले आहे फोटो काढायचा आहे याची माहिती द्या.त्या व्यक्तीने माझे जतमध्ये घरच नाही असे म्हटल्यावर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याने फोन बंद केला.हा दुर्देवी प्रकार असून अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना पैसे कशात काढायचे याची समज कधी येणार अशी चर्चा नागरिक करीत आहेत.या शौचालय चौकशीसाठीचा हा अजब नमुना समोर आला आहे. ही योजना सुरू होण्यापूर्वी ज्यांच्या घरी शौचालयाचे पूर्ण बांधकाम होते अशा नागरिकांची नावे लाभार्थी यादीत आहेत.यामुळे हा शौचालय घोटाळा म्हणजे संगनमताने शासनाच्या निधीवरती मारलेला डल्ला असून सध्या प्रांताधिकाऱ्यांच्या समितीमार्फत चौकशी सुरू आहे.या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई तर करावीच शिवाय बोगस लाभार्थीकडून निधीची वसुली करावी जेणेकरून शासकीय निधीचा अपव्यय टळेल.असेही ढोणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘ ज्या व्यक्तीला फोन करून चौकशी केली त्या व्यक्तीच्या नावाने खर्च झालेला नगरपरिषदेचा निधी नक्की कुणी घेतला याचा शोध घेतल्यावर या घोटाळ्याचा मास्टर माइंड समोर येईल’

error: Content is protected !!