संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

🎄 नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🌸 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌲 *अध्याय ११ वा*
🌸 *।विश्वरूपदर्शनयोगः।*
🎄 *ओवी २८१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳

*🍂एऱ्हवीं गिंवसिलें आघवां ठायीं । परि सोय न लाहेचि कहीं । म्हणौनि त्रिशुद्धी हे नाहीं । तिन्ही एथ ॥२८१॥*
     तुला आदि, मध्य, अंत कोठे आहेत, हे सर्व ठिकाणी निरखून पाहिले, परंतु कोठे थांग लागत नाही; म्हणून हे तिन्ही तुझ्या ठिकाणी नाहीत हे त्रिवार सत्य आहे.
*🍂एवं आदिमध्यांतरहिता । तूं विश्वेश्वरा अपरिमिता । देखिलासि जी तत्त्वतां । विश्वरूपा ॥२८२॥*
     हे आदिमध्यान्तरहिता! हे सर्व ब्रह्मांडाच्या नियंत्या! हे अमर्यादरूपा! हे विश्वरूपा! याप्रमाणे तू खरोखर आहेस, हे मी पाहिले.
*🍂तुज महामूर्तीचिया आंगी । उमटलिया पृथक् मूर्ती अनेगी । लेइलासी वानेपरींची आंगीं । ऐसा आवडतु आहासी ||२८३॥*
     तुझ्या विश्वरूप महामूर्तीच्या अंगावर ज्या अनेक निरनिराळ्या मूर्ती प्रगट झाल्या आहेत त्या पाहता, तू नाना प्रकारची आंगडी घातली आहेस, असा वाटतोस.
*🍂नाना पृथक् मूर्ती तिया द्रुमवल्ली । तुझिया स्वरूपमहाचळीं । दिव्यालंकार फुलीं फळीं । सासिन्नलिया ॥ २८४ ॥*
     किंवा नाना प्रकारच्या निरनिराळ्या मूर्ती ह्याच कोणी निरनिराळी वृक्षे वेली असून, त्या तुझ्या विश्वरूपी महापर्वताचे ठिकाणी दिव्य अलंकाररूपी फळा फुलांनी भरास आल्या आहेत.
*🍂हो कां जे महोदधीं तूं देवा | जाहलासि तरंगमूर्ती हेलावा । कीं तूं एक वृक्षु बरवा । मूर्तिफळीं फळलासी॥२८५॥*
     किंवा देवा! असेही वाटते की तू महासमुद्र असून, मूर्ती ह्या तुझे तरंगरूप हेलकावे आहेत किंवा तू एक सुंदर वृक्ष असून मूर्तीरूप फळांनी फलद्रूप झाला आहेस.
*🍂जी भूतीं भूतळ मांडिलें । जैसें नक्षत्रीं गगन गुढलें । तैसें मूर्तिमय भरलें । देखतसें तुझें रूप ॥२८६॥*
     अहो जी देवा! जशी पृथ्वी भूतांनी व्यापिली आहे किंवा आकाश नक्षत्रांनी भरले आहे, त्याप्रमाणे तुझे विश्वरूप मूर्तीने भरलेले मी पाहात आहे.
*🍂जी एकेकीच्या अंगप्रांतीं । होय जाय हें त्रिजगती । एवढियाही तुझ्या आंगीं मूर्ती । कीं रोमा जालिया ॥२८७॥*
    देवा! काय सांगू! तुझ्या अंगावर दिसणार्‍या एका एका मूर्तीच्या एका एका अवयवावर हे त्रैलोक्य, उत्पन्न व नष्ट होत असून, एवढ्याही मूर्ती तुझ्या अंगाचे ठिकाणी रोमाप्रमाणे दिसत आहेत.
*🍂ऐसा पवाडु मांडूनि विश्वाचा । तूं कवण पां एथ कोणाचा । हें पाहिलें तंव आमुचा । सारथी तोचि तूं ॥२८८॥*
    असा हा विश्वरूपाचा विस्तार मांडून राहिलेला तू कोण व कोणाचा हे मी पाहिले, तेव्हा आमचा जो सारथी श्रीकृष्ण, तोच तू आहेस, असे दिसून आले.
*🍂तरी मज पाहतां मुकुंदा । तूं ऐसाचि व्यापकु सर्वदा । मग भक्तानुग्रहें तया मुग्धा । रूपातें धरिसी ॥२८९॥*
    भगवंता! मला असे वाटते की तू असाच सदासर्वदा व्यापक आहेस, पण भक्तांवर प्रेमवृध्दिरूप अनुग्रह करण्याकरिता तू सुंदर गोजिरवाणे एकदेशीय श्रीकृष्णस्वरूप धारण करतोस.
*🍂कैसें चहूं भुजांचें सांवळें । पाहतां वोल्हावती मन डोळे । खेंव देऊं जाइजे तरी आकळे । दोहींचि बाहीं ॥२९०॥*
   ️ तुझे ते चतुर्भुजरूप कसे सुंदर व गोजिरवाणे आहे की जे पाहताक्षणी मनाची व डोळ्यांची तृप्ती होते आणि प्रेमाने आलिंगन देऊ म्हटल्यास आम्हाला आपल्या दोन हातांनी ते कवटाळता येते.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
🎈 *_॥ जयजय रामकृष्ण हरि ॥_*
🎈 *ओवी २९१ पासून क्रमश:*

error: Content is protected !!