संत ज्ञानेश्वरांनी यशोगाथा

🍁 नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🍂 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌸 *अध्याय ११ वा*
🍂 *।विश्वरूपदर्शनयोगः।*
🍁 *ओवी ३०१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳

*🏺हो कां महातेजाचिया महार्णवीं | बुडोनि गेली सृष्टी आघवी । कीं युगांतविजूंच्या पालवीं । झांकलें गगन ॥ ३०१ ॥*
       असे वाटते जणू काय या तुझ्या महातेजाच्या समुद्रात सर्व सृष्टी बुडून गेली आहे किंवा कल्पांतसमयीच्या वीजांच्या वस्त्रांनी सर्व आकाश झाकून टाकले आहे.
*🏺नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचू बांधला अंतराळां । आतां दिव्य ज्ञानाचिया डोळां । पाहवेना|३०२|*
      किंवा सर्व सृष्टीचा प्रलयकारी संहार करणार्‍या ज्वाळा तोडून जणू काय आकाशात माळाच बांधला; म्हणूनच आता ह्या माझ्या दिव्यदृष्टीनेही ते तेज पाहवत नाही.
*🏺उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत आहे अतिदाहसु । पडत दिव्यचक्षुंसही त्रासु । न्याहाळितां॥३०३॥*
     ते तेज अधिकाधिक फार वाढून अत्यंत दाहक होत आहे व ते पाहताना माझ्या दिव्यचक्षुलाही त्रास होत आहे.
*🏺हो कां जे महाप्रळयींचा भडाडु । होता काळाग्निरुद्राचिया ठायीं गूढु । तो तृतीयनयनाचा मढू ।  फुटला जैसा॥३०४॥*
     असे वाटते की महाप्रलयातील महातेजाचा भडका, काळाग्निरूद्राच्या ठिकाणी जो गुप्त होता, तो तृतीय नेत्ररूप तेजाचा साठाच जणू काय बाहेर पडला.
*🏺तैसें पसरलेनि प्रकाशें । सैंघ पांचवनिया ज्वाळांचे वळसे । पडतां ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती॥३०५॥*
    अशा त्या सर्वत्र पसरलेल्या तेजाने संपूर्ण पाचही अग्नीच्या (गार्हपत्य, आहवनीय, दाक्षिणाग्नि, सम्य आणि आवसथ्य असे पाच अग्नी) ज्वाळांचे वेढे पडल्यामुळे सर्व ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत.
*🏺ऐसा अद्भुत तेजोराशी । जन्मा नवल म्यां देखिलासी । नाहीं व्याप्ती आणि कांतीसी । पारु जी तुझिये ॥ ३०६ ॥*
     याप्रमाणे जणू काय तेजाची राशीच असा अत्यंत आश्चर्यकारक, जन्मापासून आजच पाहत आहे. या तुझ्या व्याप्तीला व कान्तीला मर्यादाच नाही.
➖➖➖➖👇➖➖➖
*_⛳त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् । त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥ १८॥_*
अर्थ 👉  _वेदांकडून जाणण्याला योग्य असे अविनाशी ब्रह्म तू आहेस. या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस. अव्यय व शाश्वत अशा धर्माचा रक्षण करणारा आणि सनातन असा पुरुष तू आहेस असे मला वाटते._
➖➖➖➖👆➖➖➖
*🏺देवा तूं अक्षर । औटाविये मात्रेसि पर । श्रुती जयाचें घर । गिंवसीत आहाती ॥ ३०७ ॥*
     देवा ! वेद ज्या तुझ्या ठिकाणाचा शोध करीत आहे, तो तू अविनाशी असून ओंकाराच्या साडेतीन मात्रेच्या पलीकडे आहेस – म्हणजे ॐ कारालाही तू अगम्य आहेस.
*🏺जें आकाराचें आयतन । जें विश्वनिक्षेपैकनिधान । तें अव्यय तूं गहन । अविनाश जी ॥३०८॥*
     तू सर्व आकारांचा आश्रय आहेस म्हणजे सर्व नामरूपे तुझ्यावरच भासतात. संपूर्ण विश्व सांठविण्याचे एकमेव, नाश न पावणारे असे अविनाशी व अपार असे स्थान तूच आहेस.
*🏺तूं धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तूं नित्य नवा । जाणें मी सदतिसावा । पुरुष विशेष तूं ॥३०९॥*
     _तू धर्माचे जीवन असून, तू अनादि, स्वतःसिध्द व नित्य नूतन आहेस. प्रकृतिजन्य छत्तीस तत्वांच्या पलीकडे सदतिसावा विशेष पुरुष म्हणून जो सांगितला आहे, तो तू आहेस, हे मी आता जाणले._
➖➖➖➖👇➖➖➖
*_⛳अनादिमध्यान्तमनन्तवीर्यं अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् । पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥ १९॥_*
अर्थ 👉 _ज्याला आदि नाही, मध्य नाही व अंत नाही, ज्याच्या पराक्रमाला अंत नाही, ज्याचे बाहू अनंत आहेत, चंद्र, सूर्य ज्याचे नेत्र आहेत, दीप्तिमान अग्नी ज्याचे मुख आहे व आपल्या तेजाने जो या विश्वाला जणू काय गिळून टाकत आहे असा तुला मी पहात आहे._
➖➖➖➖👆➖➖➖
*🏺तूं आदिमध्यांतरहितु । स्वसामर्थ्यें तूं अनंतु । विश्वबाहु अपरिमितु । विश्वचरण तूं ॥ ३१० ॥*
     तुला आदि, मध्य, अंत नाहीत. स्वतःच्या सामर्थ्याच्या दृष्टीने तू अनंत आहेस – म्हणजे तुझे सामर्थ्य अपरिमित आहे. सर्वत्र अपरिमित असे तुझे बाहू व चरण आहेत.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
🌸 *_॥ जयजय रामकृष्ण हरि ॥_*
🌿 *ओवी ३११ पासून क्रमशः*

error: Content is protected !!