वरवंटा
नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी- आमच्या दादांना गावातील लोक (रामाकुसा) या टोपण नावानेच ओळखत होते.यांच्या अगोदरच्या पिढीमध्ये कोणीही शिकले सवरले नव्हते.कोणीही सरकारी उच्चपदा वर कार्यरत नव्हते.देशासाठी तळ हातावर प्राण घेऊन युध्द भुमीवर पराक्रम गाजवल्याचे अजिबात ऐकिवात नाही.पुर्वजांनी रानात,शिवारात प्रचंड वाडा बांधुन ठेव ल्याचे व गुप्त धनाच्या काही खुणा मागे ठेवल्याचे अवशेष ही सापडत नाहीत.किर्तनकार प्रवचनकार,एकादा दुसरा वारकरी ही निर्माण झालेला नाही. त्यामुळे या अगोदरच्या सगळ्या पिढ्या गरीबीत, दारिद्र्यात व कष्टात जगत असल्या पाहिजेत.त्यात कष्ट करी पिढीचे माझे वडील दादा वारसदार ठरले होते.त्यामुळे खरेच की काय दादा निरक्षर व आंगठे बहादुरच राहिले,ते कायमचे.परंतु त्यांच्या लहानपणी माळ आंब्याच्या मोकळ्या शिवारात इतरा सोबत गुरे राखत असताना महारवाड्या तील दामू खांडवा या व्यक्तीने खडे गोळा करुन जमीन एक सारखी हाताने चोखाळुन सपाट करुन त्यावर खडे मांडुन बारा खडीतील अक्षरांचीओळख करुन दिली.तेवढेच दादांचे शिक्षण होते. त्यानंतर त्यांना वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली.आताचे सारखे त्यांच्या काळात ग्रंथालये अस्ति त्वात नव्हती.परंतु ग्रंथ वाचन आळोआळी चालत असे.नुसत्या अक्षरांची ओळख झाल्या मुळे दादा ग्रंथ वाचनात रमत होते त्यातील अर्थ समजुन सांगु शकत होते.या कमीत कमी वयात त्यांनी सर्व ग्रंथांचे वाचन केले असले पाहिजे.दादांना परमेश्वराने बळकट शरीर प्रकृती,भारदस्त आवाज व जबरदस्त स्मरणशक्ती दिली होती. श्रावण महिन्यात रामुनेरकराच्या पत्र्याच्या खोलीत रामायण हा ग्रंथ दादा मोठ्या सुरेल आवाजात वाचन करीत व बरोबर अर्थ समजावून सांगत होते.त्या वेळी ऐकणारे श्रोते देह भान हरपुन जात होते.बाहेर श्रावणातील पावसाची मंदझार सर पत्र्यावर बरसत रहायची.तेव्हा दादांचा आवाज सुरबध्द चालायचा.त्या वातावरणाचा संगम मी दादांच्या शेजारी बसुन ऐकलेला आहे.तीस पस्तीस माणसे स्त्रीया व पुरुषांची गर्दी असायची. त्यामध्ये आबुभाई श्रीराम ओढा ओलांडून ग्रंथ ऐका वया नियमाने येत होते.एका लाकडी मेढीला टेकुन ते डोळे मिटून ऐकत व कसल्या ही प्रकारची हालचाल न करता ग्रंथ ऐकत होते. पीराच्या देवळात ही दादांचे कधी कधी पुराण वाचन व कथन चाले.मी त्यांच्याच बाजुला बसुन लाकडी खांबाच्या आड पेंगत असे.ते मला आज सुध्दा चांगले आठवते. दादांचा स्वभाव हा अत्यंत शिघ्र कोपी व भयंकर रुद्रावतारी दुर्वास ऋषी सारखा आक्रमक होता. त्यामुळे आम्ही भावंडे त्यांना खुप घाबरायचो व गप्प बसायचो.सुगीच्या दिवसांत रानात ज्वारीची कणसे ऐन हुरड्यात आलेली असायची. नारगवंडीतील खडकांच्या रानात बाभळीच्या झाडाखाली दादा जमिनीवर लहान खड्डा करुन शेणकुटाची आगटी पेटवत. शेतातील जोंधळ्याची हिरवीगार ताठे वावरातुन उपटुन बगलेत धरुन आणत.नंतर कणसे धार दार विळयाने काटुन आगटीत घालीत.शेण कुटामुळे आगटी सुरुवातीला नुसता धुर धरायची तो काळाधुर नाका तोंडात शिरा यचा.आम्ही नुसते ठसकायचो व आगटीला वारा घालायचो. त्या समृध्द शिवारात प्रत्यकांच्या जोंध ळ्याच्या शेतातुन धुरांचे लोट साऱ्या शिवारभर पसरत होते. मला तेव्हा ऋषीमुनींनी केलेल्या यज्ञाची आठवण व्हावयाची. आगटी चांगली लालभडक होऊन पेट घ्यायची कणसे चांगली खर पुस भाजायची. यमुना प्रभावती मंगल आई व मी अंथरलेल्या पोत्यावर बसायचो.दादा भाजलेले कणसे हातावर चोळायचे त्यामुळे त्यांच्या रापलेल्या वज्रमुठीत गरम हुरडा ओंजळभर साठायचा.आई फुंकुन आम्हा सर्वांना हातात द्यायची. त्यावेळी माझ्या हाल चाली मुळे माती पोत्यावर उडायची. त्या वेळी मला पोत्यावर सरळ शांत बसता येत नाही म्हणुन माझ्या मुस्काडात दादांनी उजव्या हातांनी भडकाऊन दिलेली चांगलीच आठवते आहे.त्या वेळी माझी थोरली बहीण यमुनाने मलाजवळ केले होते. त्यावेळी मी खुप चंचल व अस्थीर किरकिऱ्या स्वभावाचा होतो.मला सांभाळण्यासाठी यमुनाच पुढे असायची.मला जरा सुद्धा जमिनीवरुन चालुन द्यायची नाही.नेहमी उचलुन कडेवर घ्यायची.घरांतुन रानात येताना मी तीच्या कडेवर असल्याचे अजुन ही आठवते आहे. माझ्यामुळे ती शाळेत जाऊ शकली नाही.यमुनाआई दादा सारखीच निरक्षर
राहीली.हुरडा खाल्यावर आम्हाला तहान लागायची पण दादा पाणी पिऊन देत नसत. हुरडा खाऊन झाल्या नंतर दादा आगटी मातीने बुजवून टाकीत.तो पर्यंत सायंकाळ दाटुन आलेली असायची.दिवस रामेश्वरच्या डोंगराकडे झुकलेला असायचा सुर्याच्या तेजस्वी प्रकाशात तो डोंगर वयोवृद्ध आजोबा सारखा वाटायचा.वाघ झऱ्याचे पाणी उन्हामुळे सारखे चमकायचे. लांबुन तो डोंगर गुळगुळीत, हिरव्यागार काचेसारखा दिसायचा मला त्या वेळी डोंगरावर चढायला पायऱ्या असाव्यात असे उगीचच वाटायचे. मावळता सुर्य हा डोंगरा च्या पलिकडे कोठे जाऊन थांबत असेल असे माझ्या बालमनाला वाटत असे.आई व यमुना सायंकाळच्या कालवनासाठी मिरच्यांच्या वाफ्याकडे जायची .वांगी आणि वाफ्याच्या कडेने लावलेल्या कुंपणावरील पावट्याच्या शेंगा घम्यालात तोडुन आणायची.तर दुसरीकडे दादा जळण काटुक गोळा करण्यासाठी वाळलेल्या बाभळीच्या फांद्या कुऱ्हाडीने तोडून त्यांचे बींडे बांधुन ठेवत. मंगल आणि मी खडकांच्या वावरात दादांनी भाजुन ठेवलेल्या ओल्या हरबाऱ्याचा हावळा सोलुन खात बसायचो. त्यावेळी आम्हा दोघांची तोंडे राखे मुळे तोंडाला हात लागुन काळी मिठ्ठ पडायची. मधल्या वेळात मंगल बाभळीच्या वाळलेल्या लांबड्या शेंगा गोळा करुन वाजवत बसायची. त्या शेंगांचे तुकडे करुन पायाला पैंजन बांधण्यात गढुन जायची.थड्या पसल्या केळी आंब्यावर भोरड्यांचा एकच मोठा थवा कालवा करायचा.खडकांच्या खालच्या आंब्यावर एक व्हला ये ग कुय दोघं जीव असा घुमायचा. दादांच्या अपार कष्टातुन हिरवी गार शेती सायंकाळच्या रुपेरी उन्हात चमकत असायची. पांदी मध्ये पाण्याचा प्रवाह आवाज देऊन खळखळत वाहायचा. मुंजावर आळीचा गणपा पवारांचा गुरांचा कळप वगळीतुन पाणी उडवीत चालायचा. त्यांचे शेण गोळा करण्यासाठी प्रभावती शेणाची टोपली घेऊन पळतच निसरड्या वगळीत उतरत असे व शेणाची भरलेल्या पाठीचा वजन दार छाप बाभळी खालच्या उकिंरड्यावर उठवत असे.पुढे अंधार पडायच्या आत दिवे लागणीला आम्ही घरी परतत असु. गावात पीराचे मंदिर अती प्राचीन व जुणे होते.पीराचा महाल व त्याची डागडुजी करण्याचे काम ही वेगाने चालु होते.त्या जुण्या लाकडी तुळया बाहेरच्या चौथऱ्या वर निंबाच्या झाडाखाली एकावर एक रचुन ठेवलेल्या होत्या.यमुना मला घेऊन देवळात खेळण्या साठी म्हणा किंवा देवाला पाया पडायच्या निमित्ताने आणित असे.त्यावेळी तो लाकडांचा ढिगारा माझ्या चांगलाच स्मरणात आहे. त्या काळी गाव धन धांन्य पीक पाण्याने समृध्द असायचा.माणसाची मने ही परस्परां बद्दल कृतज्ञ व प्रेमळ असायची.लग्न समारंभात सहकार्य करायची. मोठ्या व पसरट नाकाचा पीऱ्या न्हावी भावकीतील लोकांना जेव नाचे आमंत्रण देत सुटायचा.माणसे घरातुन पितळी पाण्याने भरलेले तांबे घेऊन पंगतीला येऊन बसत.वडाच्या झाडाची हिरव्यागार पत्रावळीवर लाल्या गव्हाचा तांबडा सुगंधी गुळाचा शीरा व धन टाकुन केलेली
झनझनीत आमटी व भात यां पदार्थांची नुसती रेलचेल असायची.माणसे परस्परांना मदत व साह्य करायची.पशु पक्षी आनंदी असायचे.आणि मग जेव्हा सुगी संपुन धन व धांन्य घरातील कणगीत येऊन पडल्या नंतर गाव कष्टातुन जरा थोडासा मोकळा श्वास घ्यायचा. मग गावात भिक्षे करी कलाकार, गारुड्याचे खेळ तर कधी जादुचे प्रयोग चौकात कधी चावडी जवळ तर कधी प्रसंगी पीराच्या देवळा समोरील मोकळ्या मैदानात होत होते.असाच एकदा डोंबाऱ्याचा खेळ गावात उतरला.व ते सर्व डोंबारी पीराच्या देवळात त्यांच्या सामाना सहित व बायका मुला सहित उतरला .त्यातील लहान मुले ढोलगं वाजवुन आज डोंबाऱ्याचा खेळ आहे असे मोठ्याने ओरडत गावातुन बोभाटा करीत फिरायचे. साहजीकच यमुना मला घेऊन पीराच्या देवळात जीथे लाकडी तुळयांचा ढिग लावला होता तेथेच बाजुला घेऊन बसली होती.डोंबारी बाबांचा खेळ रंगात आला होता तारेवरची कसरत व तेथुन उलट्या सुलट्या घेतलेल्या उड्या,हातावर उलटे चालणे,हे सारे थक्क करणारे होते.लगोरीने दग डाचा गोठा हवेत उडवायचा व तो दगडी गोठा डोंबारी अचुकपणे कपाळावर बांधलेल्या लाकडी चार बोटांच्या फळीवर झेलायचा. नंतर त्याने पाठीवर पन्हाळी
सारखे कवल बांधुन लगोरीने परत दगडी गोठा हवेत उडवून खाली वाकुन अचुकपणे पाठीवरील कवलावर बरोबर घेतला.कवल जागेवरच फुटायचे व तुकडे तुकडे उडायचे.पण डोंबाऱ्याला काहीच होत नसे.त्यांची काही मुले ताशा व ढोल हे वाद्य वाजवत होती.त्या तसल्या गर्दीत लाकडी तुळयावर माणसे पोरे येऊन बसल्याने वजनाने तुळईची लाकडे एकदम घसरली.व माझ्या उजव्या पाया वर आदळली. त्यामध्ये माझा पाय जोरात अडकला. मी मोठ्याने ओरडु लागताच मुंजावर आळीतील जाणकार माणसांनी तुळया बाजुला उचलुन माझी सुटका केली.दुसऱ्या दिवशी घरात आई दादा वगैरे कोणी नाही हे पाहून समोरील अंगणात मी एक टाच खेळत बसलो होतो. घरातील खापरी रांजणाच्या कोपऱ्यात वरवंटा व पाटा होता.मी हळुच वरवंटा घेऊन डोंबाऱ्याचा खेळ खेळु लागलो.दोन वेळा वरवंटा वरती फेकून हातामध्ये झेलला. तिस ऱ्यांदा मात्र वरवंटा वरती फेकुन दोन्ही हातांनी झेलताना हातातुन निसटुन माझ्या कपाळा वर आदळला व मोठी खोख पडुन जखमेतुन रक्त साऱ्या चेहऱ्यवरुन पैरणीवर पसरले गेले.बाहेरुनआई व दादाआल्यानंतर त्यांना माझा उद्योग लक्षात येताच दादांनी मला तसल्याही अवस्थेत चांगलेच कानपाटले.मग आईने जखमेत हळद भरली.तो आईच्या हाताचा स्पर्श व दादांनी हाणलेली कान सुल आजसुध्दा दोघेही हयात नसताना ताजी व जीवंत वाटते. व त्याच्या आठवणीने मन व्याकू ळ व उदास होऊन जाते.
प्रा.संभाजी लावंड.खातगुण