संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

🚩 नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🚩 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🔷 *अध्याय ११ वा*
🚩 *।विश्वरूपदर्शनयोगः।*
🚩 *ओवी ३३१ पासून*
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳

*🔰आणि महर्षी अथवा सिद्ध । कां विद्याधरसमूह विविध । हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन ॥३३१॥*
     आणि महर्षि अथवा सिध्द, तसेच नानाविध विद्याधरांचे समुदाय “तुझे कल्याण असो” असे म्हणून तुझे स्तवन करीत आहेत.
➖➖➖➖◽➖➖➖
*_🔷रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोश्मपाश्च । गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥२२॥_*
अर्थ 👉  _अकरा रुद्र, बारा आदित्य, अष्ट वसु, साध्य, विश्वदेव, अश्विनीकुमार, वायु, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पहात आहेत._
➖➖➖➖◽➖➖➖
*🔰हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे । अश्विनौ देव विश्वेदेव विभवें । वायुही हे जी ॥ ३३२ ॥*
     अकरा रुद्रांचा समूह, बारा सूर्याचा समूह, आठ वसू, सर्वसाध्य, अश्विनुकुमार, वैभवाने युक्त असे विश्वदेव, तसेच वायु
*🔰अवधारा पितर हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व । जी महेंद्रमुख्य देव । कां सिद्धादिक ॥३३३॥*
       पहा! पितर, गंधर्व, पलिकडे असलेले यक्षराक्षसगण, इंद्रादिदेव आणि सिध्दादिक
*🔰हे आघवेचि आपुलालिया लोकीं । सोत्कंठित अवलोकीं । हे महामूर्ती दैविकी । पाहात आहाती ॥३३४॥*
     हे सर्वच आपआपल्या लोकांमध्ये अत्यंत उत्कंठित होऊन तुझ्या या दैवी महामूर्तीकडे पाहात आहेत, हे पहा.
*🔰मग पाहात पाहात प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंतःकरणीं । करित निजमुकटीं वोवाळणी | प्रभुजी तुज ॥३३५॥*
     मग पाहत पाहत क्षणोक्षणी अंतःकरणात आश्चर्यचकित होऊन, आपल्या शिरावर असलेल्या मुकुटांची तुझ्यावरून ओवाळणी करीत आहेत.
*🔰ते जय जय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे । ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ॥३३६॥*
       ते मंजुळ शब्दांनी तुझा जयघोष करून, संपूर्ण स्वर्ग दुमदुमून टाकीत आहेत आणि सुंदर जोडलेले हात ते मस्तकावर ठेवित आहेत.
*🔰तियेविनयद्रुमाचिये आरवीं | सुरवाडे सात्त्विकांची माधवी | म्हणौनि करसंपुटपल्लवीं । तूं होतासिफळ॥३३७॥*
     त्या अत्यंत नम्रतारूप वृक्षाच्या अरण्यात सात्विक गुणांच्या वसंतऋतूचे ऐश्वर्य प्रगट झाले; म्हणून त्यांच्या जोडलेल्या हस्तरूपी पदरात फळरूपाने तू प्राप्त होतोस.
➖➖➖➖◽➖➖➖
*_◾रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम् । बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाऽहम्॥२३||_*
*अर्थ* 👉  _हे महाबाहो, अनंत मुखे व नेत्र असलेले अनंत बाहू, मांड्या व पाय असलेले, अनंत उदरे असलेले, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून तसाच मी देखील व्याकुळ झालो आहे._
➖➖➖➖◽➖➖➖
*🔰जी लोचनां भाग्य उदेलें । मना सुखाचें सुयाणें पाहलें । जे अगाध तुझें देखिलें । विश्वरूप इहीं ॥३३८॥*
      अहो जी भगवंता ! मन व डोळे यांनी जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले, ते डोळ्यांचे भाग्य उदयाला आले व मनाने सुखाचा सुकाळ पाहिला.
*🔰हें लोकत्रयव्यापक रूपडें । पाहतां देवांही वचक पडे । याचें सन्मुखपण जोडें । भलतयाकडुनी ॥३३९॥*
     हे तिन्ही लोकांना व्यापून असणारे तुझे विश्वरूप पाहताना देवांनाही धाक उत्पन्न होतो आणि कोणालाहि ते सन्मुखच वाटते.
*🔰ऐसें एकचि परी विचित्रें । आणि भयानकें वक्त्रें । बहुलोचन हे सशस्त्रें । अनंतभुजा ॥३४०॥*
      याप्रमाणे हे तुझे विश्वरूप एकच पण विचित्र आणि भयानक अशा भयानक अशा असंख्य मुखांनी नेत्रांनी व शस्त्रयुक्त अनंत भुजांनी युक्त आहे.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
🌸 *_॥ जयजय रामकृष्ण हरि ॥_*
🌼 *ओवी ३४१ पासून क्रमशः*

error: Content is protected !!