संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🌹 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌲 *अध्याय ११ वा*
🌹 *।विश्वरूपदर्शनयोगः।*
🌲 *ओवी ३६१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳

*🐢तैसा वक्त्रांचा विकाशु ।  माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु । विश्व न पुरे म्हणौनि घांसु । न भरीचि कोंडें॥३६१॥*
      त्याप्रमाने तोंडे पसरलेली आहेत व त्यामधे जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत. त्यांच्या घासास विश्वानेही पूर्तता येणार नाही. म्हणून हे विश्वरूप या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही.
*🐢आणि पाताळव्याळांचिया फूत्कारीं । गरळज्वाळा लागती अंबरीं ।तैसी पसरलिये वदनदरी ।  माजीं हे जिव्हा ॥ ३६२॥*
     आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या फुत्काराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात, त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा ही (प्रत्येक) वदनरूपी दरीत पसरली आहे.
*🐢काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें । जैसें पन्नासिलें गगनाचे हुडे । तैसेआवाळुवांवरी आंकडे ।धगधगीत दाढांचे ॥३६३॥*
     प्रलयकाळाच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत, तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत.
*🐢आणि ललाटपटाचिये खोळे । कैसें भयातें भेडविताती डोळे । हो कां जे महामृत्यूचे उमाळे । कडवसां राहिले ॥ ३६४ ॥*
     आणि ललाटरूप वस्त्रांच्या खोळीत असलेले डोळे, हे जसे भयासच भेडसावित आहेत, अथवा ते डोळे, महामृत्यूचे लोटच असून (भुवयांच्या) अंधारात राहिले आहेत.
*🐢ऐसें वाऊनि भयाचें भोज । एथ काय निपजवूं पाहातोसि काज । तें नेणों परी मज । मरणभय आलें ॥ ३६५ ॥*
     असे हे महाभयाचे (मृत्यूचे) कौतुक धारण करून (म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून) या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पहातोस ते मला कळत नाही. परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे.
*🐢देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलों प्रतिफळें । बापा देखिलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ॥ ३६६ ॥*
     अहो देवा, विश्वरूप पहाण्याचे डोहाळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा, तुमचे विश्वरूप पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसे झाले आहे.
*🐢अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे । परि आतां चैतन्य माझें विपायें । वांचे कीं न वांचे ॥३६७॥*
     अहो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चयेकरून नाश पावणारच. त्याची काळजी कोणी केली आहे ? परंतु आता माझे चैतन्यच कदाचित वाचेल की नाही असे मला वाटू लागले आहे.
*🐢एऱ्हवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळें तरी मन तापे । अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे ॥३६८॥*
    भयामुळे खरोखर अंग कापावयास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले की मनाला ताप होतो अथवा बुद्धी दचकते आणि अभिमान गलित होतो.
*🐢परी येतुलियाही वेगळा । जो केवळ आनंदैककळा । तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली ॥३६९॥*
    परंतु या सर्वांहून वेगळा, जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा, त्या शांत अंतरात्म्याला देखील भयाने शहारे आले.
*🐢बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु । हा गुरुशिष्यसंबंधु । विपायें नांदे ॥३७०॥*
     काय आश्चर्य आहे? विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता? त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडी केले. असा गुरुशिष्यसंबंध क्वचितच असेल.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
🌳 *_॥ जयजय रामकृष्णहरि ॥_*
🌳 *_ओवी३७१ पासून उद्या_*

error: Content is protected !!