संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

🚩 नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🚩 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🚩 *अध्याय ११ वा*
🚩 *।विश्वरूपदर्शनयोगः।*
🚩 *ओवी ३७१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳

*🗡️देवा तुझ्या ये दर्शनीं । जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं । तें सावरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें ॥ ३७१ ॥*
     देवा! या तुझ्या विश्वरूप दर्शनाने माझ्या मनात जी काही व्याकुळता उत्पन्न झाली, ती सावरण्याकरिता मी धैर्याची खोळ करण्याचा प्रयत्न करीत आहे.
*🗡️तंव माझेनि नामें धैर्य हारपलें । कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें । हें असो परि मज भलें आतुडविलें । उपदेशा इया ॥३७२॥*
        तेव्हा माझ्या ‘अर्जुन’ या नावाचे धैर्य नाहीसे झाले; कारण विश्वरूपाचे दर्शन धैर्याच्या मर्यादांपेक्षाही श्रेष्ठ झाले  हे असो, पण तुम्ही मला या उपदेशाने- म्हणजे विश्वरूप दर्शनाने-बरे संकटात टाकले.
*🗡️जीव विसंवावयाचिया चाडा । सैंघ धांवाधांवी करितसे बापुडा । परि सोयही कवणेंकडां । न लभे एथ ॥ ३७३ ॥*
       बापडा माझा जीव निर्धास्त होऊन विश्रांती मिळावी म्हणून सर्वत्र धावाधाव करीत आहे; पण या विश्वरूपात तशी सोय कोठेही प्राप्त होत नाही.
*🗡️ऐसें विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेलें आहें चराचरीं । जी न बोलें तरि काय करीं । कैसेनि राहें?॥३७४॥*
        याप्रमाणे या विश्वरूपाच्या महामारीत सर्व स्थावरजंगम जीवांचे जीवित्व नाहीसे झाले आहे. देवा!हे बोलू नये, पण काय करू? बोलण्यावाचून राहवत नाही.
➖➖➖➖👇➖➖➖
*_🌻दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि । दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास॥२५॥_*
अर्थ 👉  _दाढांच्या योगाने विक्राळ आणि प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे (दिसणारी) तुझी मुखे पाहून मी इतका गर्भगळित झालो आहे की, मला दिशाभूल झाली आहे, मला काही समाधान वाटत नाही, हे देवाधिदेवा, जगन्निवासा, (आता) प्रसन्न हो._
➖➖➖➖👆➖➖➖➖
*🗡️पैं अखंड डोळ्यांपुढें । फुटलें जैसें महाभयाचें भांडें । तैशीं तुझीं मुखें वितंडें । पसरलीं देखें ॥३७५॥*
       महाभय साठविलेले भांडे फुटल्याप्रमाणे तुझी विक्राळ मुखे मी अखंड डोळ्यांसमोर पसरलेली पाहत आहे.
*🗡️असो दांत दाढांची दाटी । न झांकवे मा दों दों वोठीं । सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ॥३७६॥*
       हे असो संपूर्ण प्रलयकालच्या शस्त्रांचे दाट कुंपण लागावे, त्याप्रमाणे तुझ्या मुखांतील दातदाढांची असलेली दाटी दोन्ही ओठांनी झाकली जात नाही.
*🗡️जैसें तक्षका विष भरलें । हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें । कीं आग्नेयास्त्र परजिलें । वज्राग्नि जैसें ॥ ३७७ ॥*
       जणू काय विषारी तक्षकाचे ठिकाणी विष भरले, प्रलयकालच्या रात्री भूतांचा संचार झाला किंवा प्रलयाग्नीने पुनः अग्नेयास्त्र हातात घेतले.
*🗡️तैशीं तुझीं वक्त्रें प्रचंडें । वरि आवेश हा बाहेरी वोसंडे । आले मरणरसाचे लोंढे । आम्हांवरी ॥३७८॥*
       त्याप्रमाणे तुझी ही प्रचंड भयंकर मुखे असून त्यातही पुनः त्यांचा आवेश बाहेर प्रगट होत आहे. असे वाटते की त्यातून आम्हावर मरणरूपी रसांचे लोंढे आले आहेत.
*🗡️संहारसमयींचा चंडानिळु ।आणि महाकल्पांत प्रळयानळु । या दोहीं जैं होय मेळु । तैं काय एक न जळे?॥३७९॥*
        देवा! प्रलयकाळचा भयंकर वायू व महाकल्पाच्या वेळचा प्रलयाग्नी, हे दोन्ही मिळाले असता काय जळणार नाही?
*🗡️तैसीं संहारकें तुझीं मुखें । देखोनि धीरु कां आम्हां पारुखे?। आतां भुललों मी दिशा न देखें ।आपणपें नेणें॥३८०॥*
        त्याप्रमाणेच तुझी सर्व ब्रह्मांडाचा संहार करणारी मुखे पाहून, धैर्य आम्हाला स्पर्श करील काय? आता मी भ्रमिष्ट दिङ्मूढ झालो व मला माझेही भान राहिले नाही.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🚩 *ओवी३८१ पासून क्रमशः*
🚩 *_॥ जयजय रामकृष्णहरि ॥_*

error: Content is protected !!