संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी (सचिन शिंदे)
🚩 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🚩 *अध्याय ११ वा*
🚩 *।विश्वरूपदर्शनयोगः।*
🚩 *ओवी ४११ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🍀कां महाकल्पाचिया शेवटीं । जैं कृतांतु कोपला होय सृष्टी । तैं एकविसांही स्वर्गां मिठी । पाताळासकट दे ॥४११*
     किंवा महाकल्पाच्या शेवटी संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याकरिता जेव्हा कृतांत सर्व सृष्टीवर कृध्द होतो, तेव्हा तो पाताळासह एकवीस स्वर्गांना ग्रासून टाकतो.
*🍀नातरी उदासीनें दैवें । संचकाचीं वैभवें । जेथींचीं तेथ स्वभावें । विलया जाती ॥४१२॥*
    अथवा दैव प्रतिकूल झाले असता, धनसंचय करणार्‍याची संपत्ती, जशी जागच्या जागी नाहीशी होते.
*🍀तैसीं सासिन्नलीं सैन्यें एकवटें । इये मुखीं जाहलीं प्रविष्टें । परी एकही तोंडौनि न सुटे । कैसें कर्म देखा ॥४१३॥*
   त्याप्रमाणे युध्दाला सज्ज झालेली ही दोन्ही सैन्ये, तुझ्या मुखांत एकत्र शिरली आहेत. त्यापैकी तुझ्या मुखांतून एकही सुटत नाही. कसे त्यांचे कर्म आहे, पहा.
*🍀अशोकाचे अंगवसे । चघळिले कऱ्हेनि जैसे । लोक वक्त्रामाजीं तैसे । वायां गेले ॥४१४॥*
    उंटाने अशोकवृक्षाचे डहाळे जसे चघळावे, त्याप्रमाणे सर्व लोक तुझ्या तोंडांत व्यर्थ गेले आहेत.
*🍀परि सिसाळें मुकुटेंसीं । पडिली दाढांचे सांडसीं । पीठ होत कैसीं । दिसत आहाती ॥४१५॥*
   राजांची मुकुटासहित शिरे दाढांच्या सांडशीत सापडून त्यांचे कसे पीठ होताना दिसत आहे.
*🍀तियें रत्नें दांतांचिये सवडीं । कूट लागलें जिभेच्या बुडीं । कांहीं कांहीं आगरडीं । द्रंष्ट्रांचीं माखलीं ॥४१६॥*
   मुकुटांतील रत्ने दातांच्या संधीत असून, मस्तकांचे चूर्ण जिभेच्या बुडाशी लागले आहे व काही काही दाढांची टोकेही माखली आहेत.
*🍀हो कां जे विश्वरूपें काळें । ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें । परि जीवित्व देहींचीं सिसाळें । अवश्य कीं राखिलीं ॥४१७॥*
   हो! एक गोष्ट मात्र दिसते की, या विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बळ ग्रासून टाकली; पण त्या जीवांच्या शरीरांची मस्तके मात्र न गिळता तशीच ठेवली.
*🍀तैसीं शरीरामाजीं चोखडीं  । इयें उत्तमांगें होतीं फुडीं । म्हणौनि महाकाळाचियाही तोंडीं । परि उरलीं शेखीं ॥४१८॥*
  ही सुंदर मस्तके म्हणजे शरीरातील खरोखर उत्तम अंगे असल्यामुळे, ती महाकिळाच्याही तोंडात शेवटी उरली आहेत.
*🍀मग म्हणे हें काई । जन्मलयां आन मोहरचि नाहीं  । जग आपैसेंचि वदनडोहीं । संचारताहे ॥ ४१९ ॥*
  पुढे अर्जुन म्हणतो, अरे! हे काय आश्चर्य! जन्माला आलेल्या प्राण्यांला दुसरी गतीच दिसत नाही. सर्व जगत् आपण होऊन विश्वरूपाच्या मुखरूपी डोहात शिरत आहे ना !
*🍀यया आपेंआप आघविया सृष्टी । लागलिया आहाति वदनाच्या वाटीं । आणि हा जेथिंचिया तेथ मिठी । देतसे उगला ॥ ४२० ॥*
  ही संपूर्ण सृष्टी सहजगत्या विश्वरूपाच्या मुखात जाण्याच्या मार्गास लागली आहे आणि हा विश्वरूप भगवान जागच्या जागीच स्वस्थ त्यांना गिळीत आहे.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
🍀 *_ओवी ४२१ पासून उद्या_*
🍀 *_॥ जय जय रामकृष्ण हरि ॥_*

error: Content is protected !!