संविधान प्रचारक लोक चळवळ विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने कराड न्यायालयात संविधान दिन साजरा

नवचैतन्य टाईम्स कराड प्रतिनिधी(ॲड पंडित गायकवाड)-विधी सेवा प्राधिकरण आणि संविधान प्रचारक विविध संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 नोव्हेंबर या संविधान दिनी कराड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
न्यायपालिका ही संविधानाचा अविभाज्य भाग तसेच प्रमुख संरक्षक असून त्यांनी संविधाना प्रति कायम प्रामाणिक असावे या प्रामाणिक हेतूने विधी सेवा प्राधिकरण देशभर कायदेविषयक विविध उपक्रम घेत असते. विविध उपक्रमातून नागरिकांना कायदेविषयक सजग करणे व त्यातून त्यांच्या संविधानिक हक्कांचे संरक्षण करणे या हेतूसाठी विधी सेवा प्राधिकरण सातत्यपूर्ण प्रयत्नशील असते.
संविधान दिनाच्या औचित्याने नागरिकांना संविधान विषयक सजग होण्यासाठी, संविधान विषयक नागरिकांनी जागरूक होण्यासाठी संविधान प्रचारक चळवळ तसेच विधी सेवा प्राधिकरण यांनी कराड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आवारात विविध सामाजिक संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा केला. न्यायपालिकेच्या सर्व घटकांनी म्हणजेच सन्माननीय न्यायाधीश, वकील वर्ग, कर्मचारी वृंद तसेच नागरिक यांनी एकत्र येऊन न्यायालय आवारात सामूहिकपणे संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले.
कराड विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात सन्मा. न्यायाधीश तसेच तालुका व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व कर्मचारी वर्गाने उपस्थित राहून संविधाना प्रति प्रामाणिक राहणे चा प्रण व्यक्त केला. सदर कार्यक्रमात संविधान प्रचारक चळवळ सोबत कराड सातारा मधील विविध संस्था संघटनांनी आपला सहभाग नोंदविला. यात प्रामुख्याने संविधान प्रचारक लोक चळवळ, राष्ट्रीय धर्म निरपेक्ष अभियान, मी नागरिक फाउंडेशन , बोधी फाउंडेशन , ज्ञानदीप संस्था, कोरो इंडिया प्रतिनिधी, सम्यक प्रेरणा ग्रुप आणि सामाजिक न्याय आयोग जिल्हा प्रतिनिधी यांसोबत स्थानिक विविध संस्थांनी सहभाग नोंदविला .
संविधान प्रस्ताविकेच्या वाचनानंतर कराड न्यायालय ते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संविधान प्रचार फेरी काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

error: Content is protected !!