संत ज्ञानेश्वराची यशोगाथा

नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🌸 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌲 *अध्याय ११ वा*
🌸 *।विश्वरूपदर्शनयोगः।*
🌲 *ओवी ४२१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳

*🐢ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजीं धांवत । येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनीं॥४२१॥*
    हे सर्व ब्रह्मादिकदेव वर असलेल्या मुखामध्ये वेगाने शिरत असून, बाकीचे सर्व सामान्य लोक हे अलीकडील मुखातच भरले जात आहेत.
*🐢आणीकही भूतजात । तें उपजलेचि ठायीं ग्रासित । परि याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि कांहीं॥४२२॥*
    आणि कित्येक प्राणीजात उत्पन्न झाल्याबरोबर ग्रासले जात आहेत; पण याच्या मुखातून निश्चित काही सुटत नाही.
➖➖➖➖🌹➖➖➖
*_🌿यथा नदीनाम् बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति | तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ||११-२८||_*
अर्थ 👉 _ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच तोंड करून गमन करत असतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी जळत असलेल्या तुझ्या मुखामधे हे नरांमधील वीर प्रवेश करत आहेत_
➖➖➖➖🌹➖➖➖
*🐢जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग । तैसें आघवाचिकडूनि जग । प्रवेशत मुखीं ॥४२३॥*
    जसे महानदीचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रात येऊन मिळतात, तशी सर्व बाजूंनी ही सृष्टी तुझ्या मुखात प्रविष्ट होत आहे.
*🐢आयुष्यपंथें प्राणिगणी। करोनि अहोरात्रांची मोवणी । वेगें वक्त्रामिळणीं । साधिजत आहाती॥४२४॥*
   सर्व प्राणी समुदाय, आपल्या आयुष्यरूपी मार्गाने दिवस व रात्र यांच्या पायर्‍या करून अत्यंत त्वरेने तुझ्या मुखात पडण्याचे साधीत आहेत.
➖➖➖➖🌹➖➖➖
*_🌿यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः | तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः||२९||_*
अर्थ 👉 _अत्यंत वेगाने युक्त होत्साते पतंग ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नीमध्ये स्वत:च्या नाशाकरताच प्रवेश करतात, त्याप्रमाणेच हे प्राणी अत्यंत वेगाने युक्त होत्साते (स्वत:च्या) नाशासाठीच तुझ्या मुखांमधे प्रवेश करत आहेत._
➖➖➖➖🌹➖➖➖
*🐢जळतया गिरीच्या गवखा । माजीं घापती पतंगाचिया झाका । तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडती॥४२५॥*
   पेटलेल्या पर्वताच्या दरीत ज्याप्रमाणे पतंगाच्या झुंडीच्या झुंडी जाऊन पडतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक तुझ्या मुखात पडत आहेत.
*🐢परि जेतुलें येथ प्रवेशलें । तें तातलिया लोहें पाणीचि पां गिळिलें । वहवटींहि पुसिलें । नामरूप तयांचें॥४२६॥*
    पण तुझ्या मुखात जेवढे काही गेले, तेवढे सर्व तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याप्रमाणे गिळले गेले. त्यांचे वहिवाटीपुरते देखील नामरूप राहिले नाही.
➖➖➖➖🌹➖➖➖
*_🍀लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः | तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो||११-३०||_*
अर्थ 👉  _जळत असणार्‍या मुखांनी सर्व लोकांना सर्व बाजूंनी गिळीत असणारा तू (अतितृप्तीमुळे) जिभा चाटीत आहेस. हे विष्णो, आपल्या तेजाने सर्व जग व्यापून तुझी प्रखर तेजे जगाला ताप देत आहेत_
➖➖➖➖🌹➖➖➖
*🐢आणि येतुलाही आरोगण । करितां भुके नाहीं उणेपण । कैसें दीपन असाधारण । उदयलें यया॥४२७॥*
   आणि इतकेहि भक्षण करून याची भूक यत्किंचितही शांत झाली नाही. कसा याचा जठराग्नी अत्यंत प्रदिप्त झाला आहे.
*🐢जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । का भणगा दुकाळु पाहला । तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवें चाटितां ॥४२८॥*
   ज्याप्रमाणे ज्वरातून उठलेला रोगी किंवा दुष्काळात सापडलेला भिकारी खाय खाय करतो, त्याप्रमाणे ओठ चाटताना जिभेची वळवळ दिसत आहे.
*🐢तैसें आहाराचे नांवें कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं । कैसी समसमीत नवाई ।भुकेलेपणाची॥४२९॥*
   तसेच तुझ्या खाण्याचा नव्हे असा कोणताच पदार्थ तुझ्या तोंडातून सुटला नाही. अत्यंत भुकेचे नवल कसे आहे !
*🐢काय सागराचा घोंटु भरावा?। कीं पर्वताचा घांसु करावा? । ब्रह्मकटाहो घालावा । आघवाचि दाढे ॥४३०॥*
     संपूर्ण समुद्राचा घोट घ्यावा की सगळ्या पर्वताचा एकच घास करावा अथवा हे सर्व ब्रह्मांड असेच्या असेच दाढेखाली घालावे.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
🌿 *_|| जयजय रामकृष्णहरि ||_*
🌿 *_ओवी ४३१ पासून उद्या_*

error: Content is protected !!