कोणे एके काळी

नवचैतन्य टाईम्स वाई(प्रा.संभाजी लावंड)-कोणे एके काळी खातगुण गावा तील लोक परस्परांशी अत्यंत आदराने व आपुलकीने वागत होते.एकमेकांची ख्याली खुशाली पुसत
होते.एकमेकांचा मान सन्मान राखीत होते.कुणाचं दुखलं खुपल तर मनाला वाईट वाटुन घेत होते. कुणाच चांगलं झालं तर आनंदात सहभागी होत होते.दारात तुळस नागासारखी डुलायची. गावकीचा छबु ब्राह्मण गावातील मुला मुलीं ची लग्ने लावुन द्यायचा व प्रत्ये काच्या घरी पंचांग सांगुन ओंजळ भर जोंधळे घेऊन जायचा. पत्रा वळी पुरवणारी गावची लक्ष्मी गुरवीन गोल कुर्कुलीत पीठ गोळा करायला गावातुन फिरायची. मठा तील गोसावी बापुंची अल्लख भाग्यवंताच्या दारात घुमायची. गावची लक्ष्मी माळीन नवरात्रात घटांची माळ पुरवायची,व कण्हेरी च्या लाल भडक सुवासिक फुलां चा तुरा नवर देवाच्या मुंडाशात प्रेमाने खोवायची. यदु कारंडे व भिकु माने गावाला पायताने पुरवत होते. दिवसभर रापीने चामडे कापीत बसायचे. बाबु सुताराच्या नेटावर शेतकरी अवजारे दुरुस्त साठी मागे लागत होती.जगु लोहार खुरपी,विळे, कुऱ्हाडी, गावातील लोकांना शेवतून धार लाऊन द्यायचा. अण्णा हजारे यांच्या दुकानातील भाता एका लयीत वाजत होता. नाईक हिंदुराव,बाळू,बंडु,निवृत्ती, बाजी मदने ही मंडळी टोपलीत भाकऱ्या गोळा करताना हातातील आवाज जोत्यावर करीत होते. बाबा परीट गावच्या वाकळा नदी वर धुण्यासाठी घाई करीत होते. परड्यात अंता रामोशी आणि रामा मांडके कडब्याच्या गंजी लाकडी थोपटण्याने थोपटुन थोप टून काडीच्या पेटी सारखे आकार देत होते. बैल,गाई,गुरे,शेरड,करडं तों डाला फेस येईपर्यंत रवंथ करीत होती.दगडु अण्णांच्या माळातील तांबुस माती घमेल्यात गोळा करुन पळसुतारणीच्या खडकावर पाणी चिखल मळुन एरंडाच्या पानात झाकुन घरी आणायचा .अंगणात बसुन बैले तयार करण्याच्या उद्योगात कशा चेही भान नसायचे. बेंदराच्या दिवसात शाळेत जाऊ वाटायचे नाही.शाळा बुडवुन बैलांच्या मिरवणुकीत मिसळून जायला बरे वाटायचे. दोन सनया,एक बोंगा, दोन पिपाण्या,ढोलकी, ताशा, डफ, तुणतुणे व मंजुळ टाळांच्या आवाजात वीस पंचवीस बैलांच्या जोड्यांची मिरवणूक निघायची. त्यामध्ये शिवा जोगती ढोलकीच्या तालावर सनईच्या लयीवर थैया थेया नाचायचा.हणमा नेरकर विशिष्ट प्रकारचा आवाज काढुन सहभाग नोंदवायचा. कुडाळक रीन कलावंतीन
स्त्रियांचा ताफा अगोदरच ठरवुन आणलेलाअसायचा.चावडी,
तालमीजवळ,गुरवाच्या दुकाना समोर व वाण्याच्या चौकात संगीत बारीचा डाव रंगायचा. दिवसा उजेडी कलावंतीन स्त्रिया पायात घुंगराचे चाळ बांधुन ताल बद्ध नाचायच्या. बैलांच्या वरात संपल्यावर सायं काळी कडुस पडल्या नंतर रात्री नऊ वाजता सर्वांचे जेवणखाण उरकल्यावर नेर करांच्या छपरात रंगीत व संगीत बारी ढोलकी बरोबर रंगायची.सोबत पेटी, तुणतुणे व टाळ यांच्या तालावर कलावंती नीचे पदन्यास दिल खेचक होत होते. मराठीतील लावण्या ऐक तानाआम्ही जागेवरच नाचायचो. गॅसबत्तीच्या उजेडात हा कार्यक्रम उजळुन निघायचा.परभु नाना, बापू माळ्याचा पकु,वाल्मिकी कोळी आणि गंगा मांडक्याचा जावंई कलावंतीनीला एक सारखे पैसे सोडायचे.युसुफ पहिलवान अंगात लाल शर्ट आणि पांढरी पॅट घालून, रुबाबात उपस्थित रहा यचा.बेंदराला चुकुन माखून एखादी दुसरी पावसाची सर यायची.व वळचण गळायची. आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या वळचणीला लावुन गांवकीचे राजाराम साठे, दादा साठे मोठ्या चलाखीने निघुन जात होते.कासरं दावं,आळे,दोर खंड व म्होरक्या गावाला पुरवत होते.तुळशीच्या लग्नाची भिंत चुन्याने रंगवण्या साठी श्री शंकर कोळी,शिवा कोळी,नामु कोळी,बबन कोळी, रघु कोळी,भानु कोळी पावना कोळी, घाई घाईने कामाला लागत होते.रानात पांडाव घाल ण्यासाठी लोक त्यांच्या दारात नंबर लावत होते.ओल्या हरबऱ्या ची,तांदळीची, पालकाची गव्हा तील पात्रीची,भाजी,व भाकरी खाऊन लोक सुखी व समाधानी रहात होते. श्री राम मंदिरात
रघु तात्याचे ग्रंथ वाचन वर्षानुवर्षे चालत होते. बायका एकमेकींच्या घरी जाऊन वाकळा शिवत होत्या तपकिरी ओढायला देत होत्या.
ताकाने भरलेली तवली आणि गुळ घालून शिजवलेली
खरवजाची चिटकी नको नको म्हटले तरी आवर्जून ठेवून जात होत्या.शिवारातआंबे,वड,पिंपळ,पिंपरण,चिंच,सिताफळे,रामफळे,उंबर,बोरी,जांभळ,आवळा, करंज बाभळी गावची जुनी झाडे गावा वर चवऱ्या ढाळीत कितीतरी वर्षे उभी होते. तिन्हीही पाणवठ्यावर ग्रामस्थ अंघोळीसाठी बादली व घागर घेऊन गर्दी करत होते. तंबाखुचे बार मळत व बोटांनी दाताला मिशेरी लावत होते. झाड्यासाठी ओढा जवळ करत होते.याच वेळी रामोशाच्या जन्या अर्जुन आप्पांच्या करंजाडातुंन सात कांदी मधाची फांदी हातात घेऊन दुरवर गेलेला दिसायचा. सकाळच्या कोवळ्या उन्हात पोपटाचे थवे राधा दळवींनीच्या बाभळीवर कलकलाट करीत बसायचे, गुजराच्या उंच माडी वर दोन वीटांच्या बोगद्यामध्ये
त्यांचा थवा असायचा.सकाळी सकाळी श्रीरंग न्हावी सोपान न्हावी, पिरु न्हावी गावकीच्या मुलांचे व मोठ्या माणसांचे केस कापण्या च्या तयारीने अंगणात हत्यारी घेऊन बसायचे.डोक्याला पटका गुंडाळणाऱ्या मंडळीमध्ये भानु खवाला,बुटका नामु,गंगा मांडके, मारुती बुटुक,पांडुरंग आप्पा, दर्ग्यातले सर्जु दादा,पांडा वाटारा,लिंबाजी आण्णा,सिताराम बुटुक,नवा वाड्यातील दिना आबा, शाहुमाळी बापु माळी,पोपटमाळी, आबुभाई यदु बुवा,दंगु नाना, दगडु आण्णा, राजाराम वारकरी, श्रीरंग मुजावर,आंधळा रघु, हे केस व दाढी कापायला येत होते. नंबर आला की समोर पोत्यावर जाऊन बसत होते. तो पर्यंत अनेक विषय चर्चेतुन ऐकायला मिळायचे.कोण आजारी पडले तर सर्वांचे डोळे करुणेने डबडबत होते. कोणाच्या विहीरीला पाणी लागले तर सर्वजण आनंदी होत होते.कोणाचा मुलगा मिलेट्रीत भरती झाला तर फार चांगले झाले असे उद् गार निघत होते. आनंदा यादव बौध्द वस्तीतुन भली मोठी वजनदार कुऱ्हाड खांद्यावर घेऊन गावात यमासारखा फिरायचा. कोणाचीही लाकडे फोडुन द्यायचा.काळ्या सावळ्या देहातुन घामाच्या धारा वहायच्या.कपाळा वरील शिवगंध ओलाचिंब होऊन नाकावरुन घरंघळायचा.त्यांची
विस्कटलेली दाढी व केस पाहिल्या वर रामायणातील वाल्या कोळ्यांची आठवण यायची.थळु फक्कड ओळखीने बरोबर कामे शोधत होते.कुणाची भिंत किंवा दगडी गराडा ढासळला तर बरोबर रचुन द्यायचे. त्यांची कमी उंची असली तरी ते प्रेमळ वाटायचे. एका हातात
थैली घेऊन ठराविक लोकांच्या तच ते माधुकरी मागत फिरायचे. भरत आवळे हा माझा वर्ग मित्र असल्याने त्याचे घरी मी जायचो. तेव्हा करंजाच्या झाडाशेजारीच उसाच्या पाचटीने शेकारलेल्या खोपटात कोणीतरी कण्हत अस ल्याचा आवाज यायचा.तोअण्णा वाघ्या असल्याचे समजले.सर्व शरिर अपंग असल्याने ते ऊन वारा,पावसात खोपटात कायम स्वरुपी पडुन होते खोपटातील स्वच्छता मंदिरा इतकी पवित्र होती.कोठे ही घाण दिसली नाही.अण्णा काळु(महार) हे अत्यंत मर्जिवाईक होते.लाकडे फोडणे,लोकांच्या पोटातील सरकलेली वाट तेलाने चोळुन जागेवर आणत होते.शरिराला मालीस करुन द्यायचे. शिवाय लग्ने समारंभाची खरकटी भांडी मना पासून घासुन पुसुन देत होते. श्रीरंग भंडारे खग्याच्या शेतातील हाराळी घाम फुटतो पर्यंत खोदुन काढीत होते.त्यांनी खुप कष्ट केल्याचे अजुनही आठवते. श्री विष्णू बुवा यादव शेतातील पेरणी एक नंबरचे करत होते. त्यांना बैलगाड्यांची खूप आवड होती. श्री भैरवनाथ महालक्ष्मी, श्रीराम, मारोती,व महादेव मंदिरात दिवा बत्ती गुरवलोक नियमाने लावत होते. श्री कांता माने यांचा पहिला शारदा साऊंड सर्व्हिस स्पिकर लग्न,उत्सव, समारंभ, बारशाला वाजायचाच.चौकात जगु दळव्या चे व दर्ग्यात श्रीरंग तात्यांचे हाॅटेल जोरात चालत होते.गाड्यांच्या शर्यतीत बैलांच्या अंगावर परल्या मांजर लाल कावाने नंबर टाका यचा.तर रंगीत मंडपात चंद्रभान गुरुजी माईकमध्ये शेतकऱ्यांची नावे पुकारत होते.भावकीत आपु लकीने कामे होत होती. लाकडे फोडणे, स्वयंपाक, बस्ता, लग्ने ही सामुहिक पध्दतीने पार पाडली जात होती. चावडी चौक व नवा वाड्याच्या कोपऱ्यावर जेवणाच्या पंगती बसायच्या. ओल्याकच पत्रावळीवर शिरा भात व आमटी चा घमघमीत वास सुटायचा.परसु अण्णा कमरेला पांढरे धोतर, अंगात पैरण व त्यावर काळा कोट,डोकीला कोशा रंगाचा पटका, व हातात वेताची काठी घेऊन श्लोक म्हणत फिरत होते. रात्री बैलगाडीत नवरा व नवरीची वरात निघायची.किसन कैकाडी व जयसिंग कैकाडी यांचा हमखास बॅंड असायचा.लेझीमाचे डाव संपल्यावर मोरांग्या नाचायच्या. वरातीपुढे पेरु सारखे मातीचे आकार असणारे भुसनळे उड वायचे. त्यातुन फुलणाऱ्या रंगीत ठिणग्या बघाव्याशा वाटा यच्या.ते मातीचे भुसनळे गोळा करण्या साठी आम्ही धडपडायचो. रघु तात्यांच्या कुमारने अशाच एका वरातीत भुसनळा लवकर न पेटल्याने विझला आहे असे समजुन खाकी चड्डीच्या खिशात ठेवला.आणि जरा उशीराने तो खिशातच उडाला. सुगीच्या दिव सात ज्वारीची कणसे कापल्या नंतर शिवारात रामा,बाबु नंदीवाले व त्यांचे कुटुंबीय कडपीतील राही लेली कणसे साऱ्या शिवारात
शोधत फिरायची.प्रत्येकाच्या खळ्यावर जाऊन जर्मनची भांडी, साबन, बांगड्या,खेळणी कणसा च्या मोबदल्यात विकत होती. धोंडा महिन्यात रामओढा व नदीचा संगमावर लोक श्रध्देने आंघोळ करत होते.मयताला कावळा लगेच शिवायचा.गावची अत्यंत प्रामाणिक माणसे पाहुन निसर्गसुध्दा गहिवरुन जात होता. पाऊस बरोबर सहा जुनला श्री रामेश्वराच्या डोंगरावर पाण्याचे ढग घेऊन यायचा.बंडु चव्हाणांच्या माळात थेंबाचे घुंघरु पायात बांधुन पत्र्याच्या शिवारात थया थया नाचत होता. गावची बारा बलुती सुखी समाधानी होते.भाऊबीजेला लक्ष्मी मांगीन नऊ वारी साडी नेसून,हातामध्ये पंचारतीचे ताट घेऊनआदराने लोकांना ओवाळताना दिसा यची.धन धान्याचा व्यापार करुन तिने कष्टात दिवस काढले होते. तालमी जवळ प्रचंड भले मोठे वडाचे झाड येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांचे, माहेर वाशिणीचे कधीकाळी स्वागत करत होते. वटवृक्षाच्या फांदीवरच श्री राम भजनी मंडळीने अनेक वर्षे दहिहंडीचे कार्यक्रम केले होते. बाबा बटरवाला सकाळी सकाळी याच वडाचे झाडाखालुन घ्या पोरां बाळांना ! राहिल साहिलं नवरा बायकोला!अशी आरोळी सका ळच्या बालीश व स्वप्नमय झोपेत का नावर यायची व मग आम्ही भावंडे धडपडुन जागे व्हायचो.त्या सुंदर काळात श्रीराम ओढा खळ खळून हसत वाहा यचा.येरळा नदी वयात आलेल्या अवखळ मुलीसारखी व्हिक्टोरिया राणीने बांधलेल्या धरणावरुन उड्या टाकीत फेसाळत वहायची. ओढा आणि नदीच्या वाहत्या प्रवाहामुळे अनेक ठिकाणी मोठ मोठे डोह पडलेले होते. सरकारी पत्र्या जवळचा डोह,पळ सुतारणीचा डोह,मळवीतला डोह, इनामातील डोह प्रसिध्द होते. शाळा बुडवून आम्ही पोरे मनसोक्त डुंबायचो. गावच्या शिवारातील मधुर व चवदार आंबे, मळवीतील पिक लेली बोरे,कारे, बर्डातील सिता फळे, काचकीतील मुलांनकी तील,आटाळीतील,तोड करच्या शेतातील,व अर्धवट पड लेल्या बंगल्या शेजारील झाडांची जांभळं खाऊन जीभ निळी व्हायची. कुमार,दिलावर, सोपान काकांचा लालजी व मी स्वतः रंगलेल्या जीभा दाखवत राहायचो.
प्रा.संभाजी लावंड.खातगुण

error: Content is protected !!