कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्षबागा वाचविण्यासाठी बळीराजाचा आटापीटा सुरू,सावधगिरीच्या तंत्राचा अवलंब
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/(जालिंदर शिंदे):-सध्या कवठेमहांकाळ तालुक्याच्या काही भागात द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे तर बहुतांशी भागात हंगामास अद्याप थोडाफार अवधी आहे.या द्राक्ष पिकांचे संरक्षण व काळजी घेण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकर्यांचा सध्या आटापिटा सुरू असुन,यासाठी विविध युक्त्या तो लढवत आहे.ग्रामीण भागातील द्राक्ष उत्पादक शेतकर्यांकडून सध्या द्राक्ष पिकांच्या संरक्षणासाठी जुन्या साड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.त्यामुळे बागांना रंगीबेरंगी साज चडविल्याचे जागोजागी दिसत आहे.
तालुक्याच्या काही भागात द्राक्ष हंगाम काही प्रमाणात सुरू झाला आहे.तर बहुतांश बागांना काही अवधी बाकी आहे.तालुक्यात मुबई,दिल्ली,केरळसह विविध भागातील द्राक्ष व्यापारी त्याचप्रमाणे स्थानिक दलाल द्राक्षे खरेदीसाठी दाखल झाले आहेत.द्राक्ष हंगाम सुरु झाला असला तरी अद्याप अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची द्राक्षे विक्रीसाठी योग्य झालेली नाहीत.त्यामुळे औषध फवारणी,कडाक्याचे उन, थंडी ,धूळ,माकडे व पक्षी,प्राणी यापासून द्राक्ष पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी जुन्या व वापरात नसलेल्या साड्यांचा द्राक्ष बागेच्या वरती व सभोवती वापर केला जात आहे.द्राक्ष उत्पादक शेतकरी सातत्याने विविध कारणांनी आर्थिक नुकसानीच्या चक्रव्यूहात गुरफाटलेला असतो.कधी व्यापारी,दलाल त्यांची आर्थिक फसवणूक करतात,कधी अस्मानी संकट येते,कधी दर पडल्याने आर्थिक फटका बसतो.त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष पिकाची अतोनात काळजी घेऊन द्राक्ष विक्रीयोग्य करत असतात.
त्यामुळे सध्या दिवसा कडाक्याचे उन,रात्री थंडी त्याचबरोबर हावेतील धुळीचा द्राक्ष फळावर काही परिणाम होऊ नये त्याचबरोबर पक्षी व प्राण्यांपासून बागेचे रक्षण व्हावे यासाठी बळीराजा जुन्या साड्यांचा अवलंब करु लागला असुन बागेच्या वरती व सभोवती साड्या बांधत आहे.त्यामुळे बागा रंगीबेरंगी साड्यांनी नटल्याचे चित्र सध्या जागोजागी पहावयास मिळत आहे.