सुखी,समाधानी जगण्यासाठी साधू,संतांचे विचार आचरणात आणा-हभप तुकाराम बाबा(चिक्कलगीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत तुकाराम बीज साजरी)
नवचैतन्य टाईम्स जत/(प्रतिनिधी):- अध्यात्म सोडून माणूस भौतिक सुखाचे मागे धावू लागला आहे.माणसाने अपार कष्ट करून भौतिक सुख मिळवले पण तरीही तो सुखाच्या शोधात फिरत आहे. सुखी समाधानी जगण्यासाठी साधू,संतांचे विचार आचरणात आणा असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती,श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.चिक्कलगी भुयार येथे श्री संत बागडेबाबा यांनी तुकाराम बीज सुरू केली.प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार मठ येथे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम बीज भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. जत, मंगळवेढासह अन्य भागातून भाविक मोठया संख्येने भुयार येथे आले होते.दोन दिवस चाललेल्या तुकाराम बीज सोहळ्यात विविध कीर्तनकारांची कीर्तने रंगली.विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.यावेळी पुणे येथील शांतादुर्गा माता मठाचे मठाधिपती दिलीप मामा महाराज, विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील,भैरवनाथ साखर कारखानाचे चेअरमन अनिल सावंत,मार्केट कमेटी सभापती सोमनाथ आवताडे,सरपच दिनेश पाटील,युवा नेते भगीरथ भालके,माजी सभापती खांडेकर, आ.समाधान आवताडे यांचे स्वीय सहाय्यक फटे,अमृत पाटील,नितीन पाटील,गुरू बिराजदार यांच्यासह भाविकांची मोठी उपस्थिती होती.तुकाराम बाबा महाराज यांच्या काल्याचे किर्तनाने तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळ्याची सांगता झाली. काल्याच्या किर्तनात तुकाराम बाबा यांनी समाजातील चुकीच्या रूढी, परपंरा, अंधश्रद्धेवर हल्ला चढविला. राष्ट्रीय संत गाडगेबाबा, वैराग्यसंपन्न बागडेबाबा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजजागृतीमध्ये घालवले. समाजाने समाजासाठी काम करावे, एकमेकांना मदत करावी, तहानलेल्यांना पाणी द्यावे, भुकेलेल्यांना अन्न द्यावे, प्राणीमात्रावर दया करावी ही शिकवण दिली पण आपण आजही त्यांच्या विचाराचे आचरण करत नाही यापेक्षा मोठे दुर्देव काय. जंगलातील, वनातील प्राणिजीव शहरी भागात येऊ लागले आहेत. आपण त्यांना भितीपोटी ठार मारतो, हुसकावून लावतो, त्यांच्यावर दया दाखवत नाही हे पूर्णतः चुकीचे आहे. जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे मग अख्या आयुष्यात आपण काय चांगले काम केले याचा हिशोब आपल्याजवळ पाहिजे. सत्कर्म करा, नितीने वागा, रहा असा उपदेश तुकाराम बाबांनी आपल्या किर्तनातून दिला.
■ तुकाराम बाबांचे कार्य महान- आण्णा महाराज
संत गाडगेबाबा, संत बागडेबाबा यांच्या विचारांचा वारसा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा हे करत आहेत. आजच्या युगात दानधर्मासाठी, चांगल्या कामासाठी बोटावर मोजण्याइतकेच लोक सहकार्य करतात, कार्य करतात. कोरोना, दुष्काळ, अतिवृष्टी, अपघात असो की अन्य कोणतीही घटना घडो तुकाराम बाबा हे मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून धावून जातात, मनापासून गरजवंताना मदतीचा हात देतात. तुकाराम बाबांचे कार्य महान आहे, त्यांना सहकार्य करा, बळ द्या असे आवाहन पुणे येथील शांतादुर्गा माता मठाचे मठाधिपती दिलीप मामा महाराज यांनी यावेळी केले.