संत ज्ञानेश्वर लौकिक आणि अलौकीक

नवचैतन्य टाईम्स वाई(प्रा.डॉ.रामचंद्र यादव)देशोदेशीचे ज्ञानेश्वर :-
जीव आणि जगत यांच्या उत्पत्ती,स्थिती आणि वयाचे उपलब्ध असेल तेवढया माहितीचे जर सूक्ष्म अवलोन केले तर आपणाला असे दिसून येईल की,बहुधा प्रत्येक भाषिक समूहात (इंडियन, अरेबियन,पाश्चात्त्य,पौर्वात्य इत्यादी),देशोदेशी (भारत,चीन, जपान, इंग्लड,अमेरिका,रशिया,फ्रान्स,ग्रीक इत्यादी)विविध क्षेत्रात(उदा. धर्म,अध्यात्म,आत्मज्ञान,विज्ञान,समाजकारण,राजकारण,कला,विद्या इत्यादी)काळावर ठसा उमटविणारे चिरंतनत्वाला आव्हान देणारे, जनमानसाला प्रभावित करणारे,सर्वाना सामावून घेणारे युगकर्ते किंवा युगप्रवर्तक ज्ञानेश्वर जन्माला येत असतात.उदाहरणार्थ,गौतम बुद्ध , महावीर, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर, व्यास, वाल्मिकी, कांट, हेगेल, नितशे, शेले, किट्स, बायरन, शेक्सपियर, वर्डस्वर्थ, इब्सेन, ज्ञानेश्वर, तुकाराम, न्यूटन, गॅलिलिओ, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी कितीतरी नावे सांगता येतील.हे सारे देशोदेशीचे ज्ञानेश्वरच आहेत.भगवद गीतेत सांगितल्या प्रमाणे परमेश्वराच्या असाधारण विभूतीच आहेत. त्यांच्या रुपाने भिन्न भिन्न स्थल, काल ,प्रदेशात परमेश्वर स्वत : अवतीर्ण होऊन स्वत:चेच कार्य करवून घेत असतो. स्वत:चेच रंजन करुन घेत असतो. स्वत:च स्वत:ला पहात असतो. स्वत:च्या इच्छेची परिपूर्ती स्वत:च करुन घेत असतो. जीव, जगत हे परमेश्वराच्या आदिम इच्छेचे म्हणजे प्रकृत्तीचे /आदिमायेचे प्रकटीकरणच आहे.
संत ज्ञानेश्वर – अवतारी महापुरुष :-
अशा या महान विभूतीच्या, महात्म्यांच्या किंवा देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांच्या अलौकिक व्यक्तीमत्त्वाची मोहिनी फार मोठ्या मानवी समूहांवर स्वाभाविकपणेच पडत असते.कारण देशोदेशीचे हे ज्ञानेश्वर म्हणजे परमेश्वराची प्रतिरुपेच असतात. किंबहुना परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी जगात पाठविलेले हे अग्रगण्य दूत असतात. विश्वामित्राप्रमाणे प्रतिसृष्टी निर्माण करण्याइतके प्रचंड सामर्थ्य त्यांच्याकडे असते . तशा प्रकारची कार्ये ते आपल्या आयुष्यात करून जातात. साहजिकच त्यांच्या पश्चात त्यांच्या किर्तीचे पोवाडे समाजाकडून शतकानुशतके गायले जातात.
संत ज्ञानेश्वर हे एक असेच अवतारी पुरुष महाराष्ट्राच्या भूमित तेराव्या शतकात जन्माला आले हे महाराष्ट्राचे, मराठी भाषिक समाजाचे भाग्यच म्हणावे लागेल.विनोबा भावे यांनी म्हटल्याप्रमाणे “जगामध्ये तीन फार मोठ्या शक्ती काम करत आहेत.आत्मज्ञानशक्ती ,विज्ञानशक्ती आणि साहित्यशक्ती. साहित्यशक्ती म्हणजे शब्दशक्ती .जगामध्ये या तीन शक्तींचा परिणाम सर्वात अधिक झालेला आहे. त्यापैकी दोन शक्ती- शब्दशक्ती आणि आत्मज्ञानशक्ती ज्ञानदेवांच्या ठिकाणी एकवटलेले आहेत..जर महाराष्ट्रामध्ये एकच नाव घ्यायला सांगितले तर ज्ञानदेवांचे घ्यावे लागेल आणि दुसरे नाव घ्या म्हटले तर ज्ञानदेव- तुकाराम.तिसरा काही मध्ये शिरायचा नाही.इतका तो महान पुरुष होता.”( श्री ज्ञानेश्वर नव-दर्शन) आत्मज्ञानाच्या आणि साहित्याच्या क्षेत्रात इतक्या लहान वयात अशी अगाध आणि अलौकिक कामगिरी करणारा,अनंत काळापर्यंत जनमानसावर आपला प्रभाव टिकवून ठेवणारा,मनुष्यमात्राला ब्राह्मज्ञानाची ओळख करून देणारा, बाल असतानाच अबालवृद्धांची माऊली ठरलेला ‘ज्ञानेश्वर या नावानेच ओळखला जाणारा, मोक्षमार्गाचा आपला प्रवास यशस्वीपणे पूर्ण करणारा आयुष्यात पुर्णपणे सफल झालेला निर्दोष, निष्कलंक, गुणातीत असा कुणी मानवी पुरुष असेल तर तो म्हणजे संत ज्ञाने श्वरच म्हणता येईल.महाराष्ट्रीय जनतेच्या मनावर योग्यांची माऊली, प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती आणि परमेश्वराचा अवतार अशीच प्रतिमा कोरलेली आहे.
संत ज्ञानेश्वर- एक बहुगुणी /बहुआयामी व्यक्तीमत्व :–
संत ज्ञानेश्वर हे अवतारी पुरूष होते. स्थितप्रज्ञ योगी होते. योग योगेश्वर होते. क्रांतिकारी तत्वज्ञ होते.महाराष्ट्रातील संत संप्रदायाचे स्फूर्ति दैवत होते. महाराष्ट्रातील संत चळवळीचे आद्य प्रणेते होते. गोरक्षनाथांच्या परंपरेतील गुरुकृपा लाभलेले शिष्य होते.विश्व साहित्यातील अलौकिक प्रतिभाशाली असे रस निर्माते कवी होते. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग आणि राजयोग अशा विविध योग मार्गाची प्रत्यक्ष प्रचिती घेऊन साक्षात्काराच्या अंतिम टोकापर्यंत पोचलेले साधक होते. ते एक परमव्यापक, परमकारुणिक ,आदर्श , अंतर्मुख, आत्मसंपन्न, आत्मानुभावी आणि साक्षात्कारी संत होते. एक युगकर्ते महात्मा होते. अशाप्रकारे ज्ञानदेवांना अनेक बिरुदे बहाल करून त्यांची कितीही स्तुती केली तरी ती अपुरीच ठरेल .
ज्ञानेश्वरांचे बहुविध,बहुआयामी व्यक्तिमत्त्व हे सर्वाभूती समदृष्टी , मनाचा निग्रहीपणा,मानवतेची जाणीव,सृष्टी व्यापाराचे सूक्ष्मनिरीक्षण, प्रेमाने काठोकाठ भरलेले अंत: करण,सर्व विश्वाशी एकरुप पावलेले मन,अज्ञ जनाविषयीची अपार करुणा,अंत:कारणाचा हळूवारपणा, सहानुभूतीचा ओलावा,लोकोध्दाराची तळमळ,सर्व संग्राहक जीवन दृष्टी,मनाची प्रसन्नताआणि शालीनता,कमालीचा आत्मविश्वास प्रेमगर्भ निस्वार्थता आणि निरहंकारिता,सर्व संपन्न अशी रुपवत्ता आणि गुणवत्ता,असाधारण स्वरुपाची विनयशीलता आणि आदरभावना ,लोकांच्या अध्यात्मिक कल्याणा विषयीची प्रचंड आस्था,सर्व प्रकारची समन्वयवादी भूमिका अशा अनेक स्वभावगुणांनी समृद्ध आणि संपन्न होते. किंबहुना –“बालपणीच सर्वज्ञता वरि तेयाते” असे ज्ञानेश्वरीत त्यांनीच म्हटले आहे.त्याप्रमाणेच त्यांचे व्यक्तीमत्व हे अनेक सद्गुणांनीजन्मतःच आकाराला आले होते असे म्हणावे लागेल.
अशाप्रकारे ज्ञानेश्वरांचे व्यक्तिमत्त्व हे समाज विकासासाठी आवश्यक अशा वरील अनेक गुणांनी भरलेले होते. याशिवाय त्यांचे व्यक्तिमत्त्व हे सुक्ष्म निरीक्षणशक्ती,आत्यंतिक डोळसपणा,उत्तुंग स्मरणशक्ती, शोधक प्रतिभा,उत्कट संवेदनशीलता,प्रगल्भ बुद्धिमत्ता, सुक्ष्म संवेदनशीलता,सर्वस्पर्शी सर्वज्ञता, कलात्मकता आणि कल्पकता, रसिकता आणि चिंतनशीलता,गुरूभक्ती आणि संताविषयीचे प्रेम, चौफेर व्यासंग,व्यापक बहुश्रुतता,मराठीचा अभिमान,अपार भाषा प्रभुत्व,तत्वज्ञानाचा अभ्यास आणि प्रगाढ पांडित्य अशा अनेक साहित्यिक गुणांनी परिपूर्ण होते म्हणूनच या साक्षात्कारी संत
महात्म्याचे,सिद्ध प्रज्ञावानाचे मन श्रेष्ठ दर्जाचेजागतिक वाड्मय ( World Literature) निर्माण करणारे ठरले.त्यांच्या अलौकिक वाणीतून चिरंतन स्वरुपाचा आनंद देणारे, शांत रसाने ओथंबलेले ब्रह्मज्ञानच स्त्रवले आहे. आणि शेवटी हे अगाध वाड्मय आत्यंतिक निरिच्छ भावनेने,समर्पन वृत्तीने आणि लडिवाळपणाने त्यांनी श्री गुरूंच्या चरणी अर्पण केले आहे.अशाप्रकारे ज्ञानदेवांचे व्यक्तिमत्व हे अनेक गुणांनी संपन्न होते. किंबहुना ज्ञानदेवांचे व्यक्तिमत्व म्हणजे सर्व प्रकारच्या सद्गुणांची वा सत्वगुणांची खाणच होती.आणि जेथे केवळ सात्त्विक गुणकर्म समुहाचे दर्शन घडते ती केवळ परमेश्वराची प्रतिकृती किंवा प्रत्यक्ष मुर्तीच असते असे ज्ञानेश्वरीत सांगितलेले आहे. (क्रमशः)

error: Content is protected !!