लढा विचारांचा एक विचार ‘ रक्षाबंधन ‘ सणासाठी प्रत्येक घरातील भावा – बहिणींसाठी आपआपसातील ॠणानुबंध जपण्यासाठी,ज़ोपासण्यासाठी
नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी -(ह.भ.प.प्रा.सौ सरस्वती ताई भोसले-वाशिवले)
कोण म्हणतं बहीण रक्षाबंधन,भाऊबीज या सणांना
ओवाळणी साठी ,ओवाळते
भावासाठी बिचारीचे
अंतःकरण तळमळते
भाऊरायाच्या रूपाने
माहेर येतं घरी
म्हणून येतात काळजात
आनंदाच्या सरी
या निमित्ताने तिला वाटतं
भावाशी खूप बोलावं
माहेरच्या फांदीवर
क्षणभर तरी डोलावं
कशी आहेस ? एवढाच प्रश्न
सुखाऊन जातो
दुःखात सुद्धा एखाद-दुसरा
आनंद अश्रू डोळ्यातून ओघळतो
साडी आणली का नोट
कोणी पहात नाही
भाऊ दिसे पर्यंत तिला
घास जात नाही
लग्न होऊन सासरी जाणं
खूप कठीण असतं
बाप नावाच्या आईला
सोडून जायचं असतं
आईच्या संस्काराना मनात साठवायच असत
आई वडिलांनंतर भावासाठी आई -वडिल तिला बनायच असत*
उपटलेल्या रोपट्या सारखं
सोडावं लागतं माहेर
जन्मदात्या आई कडून संस्कारचा
स्वीकारावा लागतो आहेर
वाटतो तितका हा प्रवास
सहज, सोपा नसतो
भावासाठी काळजात एक
सुंदर सुखाचा खोपा असतो
रक्षाबंधन ,भाऊबीज हे
फक्त नाहीत सण
बहिणीं साठी ते असतं
समाधानच धन
सुरक्षेचं कवच आणि
पाठीवरचा हात
बहिणींसाठी भाऊ म्हणजे
दुःखावरची मात संकटातील साथ
कुणीतरी आपलं आहे
भावनाच वेगळी असते
म्हणून बहीण भावासाठी
वाटेकडे आणि दाराकडे
डोळे लाऊन बसते
‘ रक्षाबंधन ‘ , ‘भाऊबीज ‘
दिवस राखून ठेवा
आईच्या माघारी बहीणच
आई असते देवा
नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या समस्त भाऊ बहिणींच्या अतूट नात्याला हार्दिक शुभेच्छा*💐
सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले.