एक विचार माझ्या गणपती साठी प्रत्येक घरातील बाप्पासाठी ,प्रत्येकाच्या मनातील मोरयासाठी,
नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी-(ह.भ.प..प्रा.सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले)”पार्वती च्या बाळा, तुझ्या पायात वाळा, पुष्प हारांच्या घातल्यात माळा,
ताशाचा आवाज तरारा झाला,आणि गणपती माझा नाचत आला ” माझ्या पप्पांनी गणपती आणला,शंकर आणि पार्वती, मांडीवर बसलाय गणपती”*
“वाई च्या तू गणराया ,जागरणाला या ,या,”
अशी एक – ना -अनेक गाणी कानात घुमू लागतात, प्रतिक्षा संपते आणि आगमन स्वागतोत्सुकासाठी ,
प्रत्येक घरातील, स्त्री-पुरुष, अबाल-वृद्ध आतुर होतात,
प्रत्येक गल्ली-वाड्या-वस्तीतील नवयुवक नव्या दमाने ,हर्षाने स्वागतोत्सुक होतात.
*गणेशाविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती*
सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रारंभी ‘ॐ’ व ‘अ…’ असे दोन शब्द ब्रह्मेषाचा कंठ भेदून बाहेर आले.
प्रथमत: ॐ असा ध्वनी झाला. या ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन. गणपती हा दशदिशांचा स्वामी आहे. त्याच्या परवानगीशिवाय इतर देवतादेखील कोणत्याही दिशेने पूजास्थानी येऊ शकत नाही.
गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करतो, ती देवता तिथे येऊ शकते. यालाच महागणपती पूजन असे म्हटले जाते. म्हणूनच कोणतेही मंगलकार्य अथवा अन्य कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतीपूजन केले जाते.
जगदुत्पत्ती होण्याआधी निर्गुण व कूटस्थ स्वरूपात असलेल्या महततत्त्वास महागणपती असे म्हणतात.
ऋद्धी-सिद्धी या गणपतीच्या दोन शक्तीसहित असलेल्या गणपतीस तंत्रशास्त्रात महागणपती असे संबोधले जाते. विशिष्ट सिद्धी अथवा निखळ मोक्ष प्राप्तीसाठी उजवीकडे सोंड असलेल्या महागणपतीची पार्थिव मूर्ती घेण्याची प्रथा आहे.
पार्वतीने अंग मळापासून/मृत्तिकेपासून तयार केलेला गणेश हा देखील महागणपतीचा अवतार होय. सांप्रत गणपतीला आपण शिवपरिवारातला समजत असलो तरी शिव व गणेश. या दोन्ही देवता पूर्वी एकरूपच होत्या असेही मानले जाते.
भालचंद्र, नागभूषणे व तृतीय नेत्र ही भगवान शंकराची तिन्ही वैशिष्ट्ये गणेशमूर्तीतही आढळतात. महादेवाप्रमाणे गणेशाच्या कमरेभोवती नागबंध आहे. अनलासुराला भक्षण केल्यानंतर झालेला दाह शांत करण्यासाठी शंकराप्रमाणे गणेशानेही शिरी चंद्र धारण केल्याची कथा आहे.
‘गजवदनम चिंत्यं, तीक्ष्ण दंष्ट्रं त्रिनेत्रम’ या श्लोकात गणपतीला त्रिनेत्रधारी म्हटले आहे. गणपती तंत्रानुसार भगवान शंकराने वाजवलेल्या डमरूच्या गंभीर आवाजातून गणेशाने वेदविद्या ग्रहण केली.
शंकराचे तांडवनृत्य पाहून गणपती नृत्यकला शिकला व पार्वतीच्या नुपूर झंकाराद्वारे तो संगीत शिकला.
आपल्या शरीरात असलेल्या षट्चक्रातील आरंभीच्या मूलाधार चक्रात गणपती नित्य वास करीत असतो. म्हणून गणेशाला मूलाधारचक्राची देवता समजले जाते. मूलाधारचक्र व त्यातील कमळ ही दोन्ही लाल रंगाची आहेत व गणपतीचा रंगही लाल आहे.
गणपतीचे वास्तव्य असलेले आरंभीचे मूलाधारचक्र जागृत झाल्यावर आध्यात्मिक उन्नतीस जसा प्रारंभ होतो, तसाच कोणत्याही कामांचा आरंभही गणपतीपूजनाने केला जातो.
विघ्नहर्ता असल्याने तमाशापासून विवाहापर्यंत व नाट्यारंभापासून गृहप्रवेशापर्यंत सर्व विधींच्या आरंभी गणेशपूजन असते.
कोणत्याही लेखन कार्यास सुरवात करताना प्रारंभी श्रीगणेशायनम: असे लिहिण्याची पद्धत आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान प्रथम बुद्धीनेच होते व गणपती बुद्धिदाता असल्याने ‘श्री गणेशायनम:’ असे गणेशाचे प्रथम स्मरण करून मगच आपण इच्छित विषयाकडे वळतो.
‘महाभारत लिहिण्यासाठी महर्षी व्यासांनी बुद्धिमान अशा गणपतीची लेखनिक म्हणून निवड केली. भूतबाधा, करणी यासारखे वाईट शक्तीचे त्रास गणपतीच्या नामजपाने दूर होऊ शकतात.
मनुष्याच्या शरीरातील निरनिराळी कार्ये करवून घेणाऱ्या मूलभूत शक्तीला प्राणशक्ति असे म्हटले जाते.
गणपतीचा नामजप हा ही प्राणशक्ती वाढवणारा आहे. गणपती हा आपल्या हाकेला लवकर ‘ओ’ देणारा आहे. तो लवकर प्रसन्न होतो, असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे आपण बोलतो ती नादभाषा गणपती समजू शकतो. अन्य देवता बहुतांशी प्रकाशभाषा समजू शकतात. गणपती ही नादाचे प्रकाशात व प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे.
सर्वसाधारणपणे जनमानसात असा समज आहे की, सोंडेचे टोक उजवीकडे असणारी मूर्ती म्हणजे उजव्या सोंडेची मूर्ती, व सोंडेचे टोक डावीकडे असणारी मूर्ती म्हणजे डाव्या सोंडेची मूर्ती, परंतु हा समज चुकीचा आहे.
सोंडेचे टोक कोणत्या बाजूने वळलेले आहे, त्यावरून कोणत्या सोंडेचा गणपती हे ठरवायचे असते. उदा. सोंडेचे पहिले वळण (स्वतःच्या) डाव्या बाजूला असलेला गणपती डाव्या सोंडेचा गणपती आहे व सोंडेचे पहिले वळण स्वतःच्या उजव्या बाजूने असलेला गणपती हा उजव्या सोंडेचा गणपती आहे.
एखाद्या गणेशमूर्तीच्या सोंडेचे पहिले वळण उजवीकडे असून सोंडेचे तोंड /टोक डाव्या बाजूला वळले असले तरी ती मूर्ती उजव्या सोंडेची समजावी. उजव्या सोंडेचा गणपती पूजेत ठेवू नये असा सार्वजनिक समज आहे.
काही ठिकाणी हा समज एवढा अतिरेकी आहे की, अशा गणपतीचे पूजन करणे संकटास निमंत्रण देणारे, अथवा अकल्याणकारी समजले जाते. या समाजाचे निराकरण करण्यासाठी त्यामागची शास्त्रीय, आध्यात्मिक बाजू तपासून पाहणे हितकारक ठरते.
उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुख मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा ही यमलोकांकडे नेणारी तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे.
यमलोकांच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तिशाली असतो, तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही दृष्टींनी उजव्या सोंडेचा गणपती जागृत समजला जातो. दक्षिणेला असलेल्या यमलोकांत पापपुण्याची छाननी होते. म्हणून ती बाजू नकोशी वाटते.
जिवंतपणे दक्षिणेकडे तोंड करून बसल्यास (अथवा झोपताना दक्षिणेकडे पाय केल्यास) मृत्यूनंतर पापपुण्याची जशी छाननी होते, तशी व्हायला लागते. दक्षिणाभिमुखी मूर्तीची म्हणजेच उजव्या सोंडेच्या मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे सांभाळून करणे आवश्यक असल्यास ती मूर्ती पूजेत ठेवणाऱ्याने विशेष काळजी घ्यावी लागते.
डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे वाममुखी गणपती. वाम म्हणजे डावी बाजू उलट दिशा डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे. ती शीतलता देते. तसेच उत्तर दिशा अध्यात्माला पूरक, आनंददायी आहे. म्हणून वाममुखी गणपती पूजेत असावा असे सांगितले जाते. गणपतीचा वर्ण लाल आहे. गणेशपूजेत लाल वस्त्र, लाल फूल व रक्तचंदन वापरतात.
त्यांच्या लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रके मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात, व मूर्ती जागृत व्हावयास मदत होते. ह कळणे थोडेसे कठीण असल्याने गणपतीला लाल वस्त्र, लाल फूल आवडते, असे थोडक्यात सांगून विषय संपवला जातो.
गणेशपूजनात दुर्वांना विशेषस्थान आहे. दूर असलेल्या गणेश पवित्रकांना जवळ आणतात त्या दूर्वा होत. पवित्रक म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म चैतन्यकण. दूर्वा एकत्रित बांधून वाहिल्याने त्याचा सुगंध बराच काळ टिकतो. त्या जास्त वेळ ताज्या राहाव्या म्हणून पाण्यात भिजवून मग वाहतात. या दोन्हीमुळे गणपतीची पवित्रके बराच काळ मूर्तीत राहतात.
गणपतीला बहुधा विषम संख्येने (म्हणजे ३, ५, ७, २१) दूर्वा वाहतात. विषम संख्येमुळे भक्ती जास्त प्रमाणात मूर्तीत येते. गणपतीची मूर्ती दूर्वांची मढवून टाकली म्हणजे मूर्तीच्या बाजूला दुर्वांचा वास पसरायला लागतो.
गणपतीच्या आकारात संप्रेषित होतो. म्हणून गणपतीच्या पवित्रकांच्या आकारात या आकाराकडे येणे सोपे जाते. यालाच मूर्तीचे समाकारिकत्व ग्रहण केले असे म्हणतात. आलेली पवित्रके निघून न जाण्यासाठी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. हा गंध असेपर्यंत पवित्रके जास्त प्रमाणात राहातात. तशी ती राहावी म्हणून दिवसातून तीन वेळा दूर्वा बदलतात.
गणेशलहरी ज्या दिवशी पृथ्वीवर प्रथम आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला तो दिवस होता माघ शु.चतुर्थी, गणपतीची स्पंदने व पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात. या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी म्हणतात.
अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी. गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी म्हणतात. अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी. गणपतीचे पृथ्वीप्रमाणे मंगळवारही आधिपत्य आहे. गणपतीचा व मंगळाचा रंगही एकच आहे. अंगारकीला गणेशस्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात, तसेच मंगळाकडून येणारी गणेशस्पंदनेही पृथ्वीवर येतात. यामुळे चंद्राकडून येणाऱ्या लहरी जास्त प्रमाणात नष्ट होतात.
चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणजे मनाला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा आहे. साधकाला तर मनोलय करायचा असतो. चंद्रदर्शनाने मनाची चंचलता वाढते. अंगारकीला चंद्राकडील लहरी अधिक प्रमाणात नष्ट होत असल्याने अंगारिका विनायकी व अंगारिका संकष्टी यांचे फळ वर्षभर केलेल्या अनुक्रमे विनायकी व संकष्टी यांच्याइतके असते.