बोरगाव येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची कार्यशाळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- माझी वसुंधरा अभियान ४.० या योजनेअंतर्गत बोरगाव (ता कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्यासाठीची कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे व माझी वसुंधरा योजनेबाबतची माहिती देण्यात आली.यावेळी मुर्तीकार कुंभार यांनी साडूच्या माती पासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याचे उपस्थितांना प्रात्यक्षिक करून दाखवले.
यावेळी बोलताना मुर्तीकार कुंभार म्हणाले की श्याडूच्या मातीपासून बनवली जाणारी गणेश मूर्ती ही अगदी पर्यावरण पूरक असून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केला जात नाही.त्यामुळे ही मूर्ती पाण्यात टाकल्यास पटकन विरघळत असल्याने सदर मुर्तीची कोणत्याही प्रकारची विटंबना होत नाही.उलट प्लॅस्टर आॅफ पॅरिस अथवा इतर रसायन वापरुन बनविलेल्या मुर्त्या या पुर्णतः विरघळण्यास बराच कालावधी लागतो.त्यामुळे अश्या मुर्त्या पाण्यावर तरंगतात त्याचबरोबर त्या पाण्याच्या कडेला भग्नावस्थेत तश्याच पडून रहातात.तेव्हा पर्यावरण पूरक गणेश मूर्ती वापरणेच ईष्ट आसल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्त्या व सजावटीचे साहित्य याचे प्रदर्शनही शाळेत भरविले व त्यातून विक्रीही करण्यात आली.याचवेळी उत्कृष्ट गणेश मूर्ती बनविण्यार्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नेते जनार्दन पाटील,सरपंच सौ स्मिता पाटील,उपसरपंच सुजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री संतोष पाटील,रमेश जाधव,वनिता माने,सरस्वती पवार,माजी सरपंच नितीन पाटील, माजी उपसरपंच नामदेव पाटील,ग्रामसेवक सुधीर बनसोडेसह शिक्षक,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी ग्रामसेवक सुधीर बनसोडे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!