ह.भ.प.तुकाराम बाबांच्या इशाऱ्यानंतर अखेर वगरे तलावात पाणी दाखल लढयाला यश आल्याने शेतकऱ्यांनी साजरा केला आनंदोत्सव
नवचैतन्य टाईम्स जत/प्रतिनिधी:- जत तालुक्यातील सोन्याळ, लकडेवाडी भागातील तलावात टंचाईतून म्हैसाळचे पाणी सोडावे अन्यथा तलावात बसून बेमुदत आंदोलन करू तसेच गणेश विसर्जन करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम बाबा महाराज यांच्यासह या भागातील शेतकऱ्यांनी घेतला होता. म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात पाणी सोडतो आंदोलन मागे घ्या अशी विनंती केल्याने आंदोलन मागे घेतले होते अखेर तुकाराम बाबा यांच्यासह शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले. बुधवारी सोन्याळ येथील वगरे तलावात म्हैसाळचे पाणी दाखल झाले.
हभप तुकाराम बाबा यांच्यासह या भागातील शेतकरी संगप्पा पुजारी, सिद्धण्णा पुजारी, विक्रम पुजारी, हणमंत पुजारी, पांडुरंग पुजारी, कलप्पा शिंगे, मल्लिकार्जुन केंगार, विजयकुमार बगली, मदगौडा बिरादार, रामा लकडे, अरविंद बिरादार, राजू सरगर, संगय्या सोमी, गुंडू माडग्याळ, रमेश पुजारी, मंजुनाथ बिरादार, नंदेप्पा पुजारी, विठ्ठल बिरादार, विठ्ठल पुजारी, पिंटू मोरे, व्यंकटेश राजपूत, आशु मोहिते, पिराप्पा येडगे, चनप्पा नंदूर, ज्ञानेश्वर पाटील यांनी म्हैसाळचे कार्यकारी अभियंता यांना यासंदर्भात निवेदन देत सोमवारपासून तलावात बसून आंदोलन करू तसेच या भागातील श्री चे ही विसर्जन करणार नसल्याचा पवित्रा घेत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. यापूर्वी नऊ ऑगस्ट क्रांती दिनी हभप तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली याच मागणीसाठी सोन्याळ फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
तुकाराम बाबा यांच्यासह शेतकऱ्यांच्या लढयाला, मागणीला अखेर यश आले. बुधवारी दुपारी सोन्याळ येथील वगरे तलावात म्हैसाळचे पाणी दाखल झाले. वगरे तलावात म्हैसाळचे पाणी दाखल झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पावसाळा संपत आला, परतीचा पाऊस अद्याप झालेला नाही तेव्हा सोन्याळ, लकडेवाडी भागातील तलाव म्हैसाळच्या पाण्याने भरावेत अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
■ दुष्काळ जाहीर करा- तुकाराम बाबा
जत तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. जत पूर्व भाग दुष्काळात होरपळत आहे. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने याच मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली. तालुक्यातील सर्वच पक्षाने आंदोलने, रस्ता रोको केला तरीही शासन व प्रशासनाने दखल घेतली नाही हे दुर्देव. जत तालुका दुष्काळी तालुका जाहीर करावा, खरीप हंगाम वाया गेल्याने शासनाने मदतीचा हात द्यावा, दुष्काळातील सवलती द्याव्यात अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी बोलताना दिला.