तिसंगीत दुग्धव्यवसाय व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षणास प्रारंभ
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- सांगली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती कवठेमहांकाळ,जिल्हा अग्रणी बँक,बॅंक ऑफ इंडियाच्या बीओआय स्टार व सांगली आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने तिसंगी (ता कवठेमहांकाळ) येथे दहा दिवसीय मोफत दुग्धव्यवसाय व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ करण्यात आला.ग्रामीण भागातील युवक,युवतींनी एक कुशल उद्योजक बनावे यासाठी सदर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील युवक,युवतीचे उत्पन्न वाढावे, त्याना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा त्याचबरोबर त्यांनी स्वता स्वयं रोजगार निर्माण करावा या उद्देशाने तिसंगी (ता कवठेमहांकाळ) येथील बचत गटातील महिलांना आरसेटी सांगली यांच्या कडून हे दुग्धव्यवसाय व गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक उध्दव रसाळे यांनी दुग्धव्यवसायातील संधी,गाय आणि म्हैशीच्या जाती,वर्ण संकर,जनावरांची निवड,त्यांचा पोषण आहार,आझोलाचा वापर,चारापीक लागवडीचे पैलू व वर्गी करण,गुरांचा गोठा बाधकाम पध्दती स्वच्छता व व्यवस्थापन,कृत्रिम गर्भधारणा,गरोदर प्राण्यांचे व वासरांचे संगोपन,रोग नियंत्रण व लसीकरण त्याचबरोबर सेंद्रिय शेती व गांडूळ खत निर्मिती याबाबत सखोल मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी मुक्त संचार गोठ्याचे फायदे याविषयावरही मोठा भर देताना सर्वांनी मुक्त संचार गोठ्याची संकल्पना आत्मसात करण्याविषयी आवाहान केले.
तर प्रदीप साळुंखे यांनी यावेळी व्यक्तीमत्व विकास,उत्तम संभाषण कौशल्य,उद्योजकीय क्षमता त्याचबरोबर बॅंक व्यवहार व विविध शासकीय योजने बाबत माहिती व मार्गदर्शन केले.प्रारंभी उपसरपंच तानाजीराव कदम,ग्रामसेवक चंद्रकांत कुंभार,तालुका अभियान व्यवस्थापक रोहित माने,सीआरपी सौ पल्लवी जाधव यांच्या संयुक्त हस्ते कार्यक्रमाचे विधीवत उदघाटन करण्यात आले.
सदर कार्यशाळेत गटविकास आधिकारी उदयकुमार कुसुरकर,तालुका अभियान व्यवस्थापक विनायक जाधव,पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक संदीप धोकटे,बॅंक ऑफ इंडियाचे आरसेटीचेआरसेटीचे निर्देशक महेश पाटील यांनीही मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन प्रशिक्षक प्रदिप साळुंखे यांनी केले.तर आभार सौ पल्लवी जाधव यांनी मानले.